थोर देशभक्त आणि राष्ट्रगायक अभिजीत भट्टाचार्य यांस ट्विटर नामक ई-चावडीने जी असन्मानपूर्ण वागणूक दिली त्याचा उजवीकडून निषेध करणे क्रमप्राप्त आहे. विनोदी खासदार आणि अभिनेते परेश रावल तसेच ध्वनिप्रदूषण विरोधी चळवळीतील थोर क्रांतिकारक गायक सोनू निगम यांनी याबाबत ट्विटरविरोधात सूर छेडलेला आहेच. त्यात सर्वानी सहभागी झालेच पाहिजे. घरात फडफड करणारे झुरळ पकडून फेकावे तद्वत ट्विटरने दे. भ. अभिजीत यांना या ई-चावडीवरून फेकून दिले. त्यांचे खाते बंद केले. एखाद्याची अशी मानहानी करण्याचा ट्विटरला काय अधिकार आहे? आणि ती मानहानीही का केली, तर दे. भ. अभिजीत हे महिलांबद्दल असभ्य आणि अभद्र ट्विप्पण्या करतात. आता असते एखाद्यात अशी विकृती. पण हे काय कारण झाले? एक राजकीय कार्यकर्ती वेश्याव्यवसाय करते, असा घाणेरडा आरोप त्यांनी केला. परंतु त्यात काय विशेष? राजकारणात, समाजकारणात, चित्रपट क्षेत्रात एखाद्या महिलेला यायचे असेल किंवा नोकरी-व्यवसाय करायचा असेल, तर महिलांवर असा अर्वाच्य चिखल उडविणे ही आपली समाजमान्य टीकापद्धत आहे. परंतु लोकांस हे समजत नाही. मागे एकदा सलमान खान प्रकरणात दे. भ. अभिजीत यांनी ‘कुत्ता रोड पे सोएगा, कुत्ते की मौत मरेगा, रोड्स गरीब के बाप की नहीं हैं’ असे एक सामाजिक सत्य मांडले होते. तेव्हाही त्यांच्यावर अशीच टीका झाली. पण दे. भ. अभिजीत डगमगले नाहीत. एकदा तर त्यांना अश्लील ट्विप्पणी केल्याप्रकरणी अटकही झाली होती. पोलीस कोठडी पाहिल्यानंतर ते ढसाढसा रडले, अशा अफवा देशद्रोह्य़ांनी उठविल्या होत्या. परंतु खरे दे. भ. असे रडत नसतात. ते लढत असतात. आताही ते ट्विटरविरोधात लढतच आहेत. आता कॉलरला धरून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ट्विटर हे देशद्रोही, मोदीद्रोही आणि हिंदूंविरोधी आहे. सर्वानी हे लक्षात घ्यायला हवे. अशा ट्विटरवर सर्व देशप्रेमी, मोदीप्रेमी आणि हिंदूंनी बहिष्कारच घालायला हवा. कारण साधे आहे. ट्विटर उच्चारस्वातंत्र्याबाबत फारच पक्षपाती आहे. तुम्हांला तुमचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असेल, तर आम्हांला तुम्हांला शिव्या घालण्याचेही स्वातंत्र्यही असले पाहिजे. दे. भ. अभिजीत, ध्वनिप्रदूषणविरोधी कार्यकर्ते सोनू निगम आदींची हीच तर मागणी आहे. तुम्ही आमचे घाणेरडय़ा शिव्या देण्याचे, अश्लील लिहिण्याचे, लोकभावना भडकावण्याचे, खोटय़ा गोष्टी पसरविण्याचे उच्चारस्वातंत्र्य कसे नाकारू शकता? असे करून तुम्ही आमचे देशप्रेम, राष्ट्रभक्ती दडपू शकत नाही. खरे तर प्रत्येक देशभक्ताला कोणासही शिव्या घालण्याचे स्वातंत्र्य कायद्यानेच मिळायला हवे. ते जोवर मिळत नाही, तोवर दे. भ. अभिजीत यांच्या लढय़ाला सर्वानीच साथ दिली पाहिजे. जे देणार नाहीत, त्यांना रोज दोन तास दे. भ. अभिजीत यांची गाणी ऐकण्याची शिक्षा असा कायदा करण्याची वेळ कृपया आणू नये..