फौजा सज्ज जाहल्या होत्या. अबलख घोडय़ांवर स्वार मावळ्यांच्या मनात अंगार चेतला होता. म्यानातून तलवार उपसण्यासाठी त्यांच्या मुठी शिवशिवू लागल्या होत्या. पण ऐन वेळी ऐलवेळीगतच जाहले. राजांच्या मनासारखे तहनामे घडून आले. तह करण्यात राजांचा हात कोण धरेल? राजे मोठे मुत्सद्दी. कुंचला ऐसा की जणू तेजतर्रार तलवार. वाणी ऐशी की तोफेचा भडिमार. दोन दिल्हे.. चार घेतिले ऐशी खाशी रीत. राजे बहुश्रुत. कलादि प्रांतांत निपुण. शुभ्र पडद्यावरील रंगीतसंगीत सावल्यांचा खेळ तर तयांसी बहुत प्यारा. राजेपद त्यांनी स्वीकारले ते निव्वळ रयतेच्या भल्यासाठी. ते न स्वीकारते तर, शीतल हवेच्या एखाद्या प्रांती तेही ऐशाच एखाद्या खेळात रमती. तर, एतद्देशीय शुभ्र पडद्यावरील रंगीतसंगीत सावल्यांच्या ऐशा एका खेळात काही गनिमाचे साजिंदे भरलेले. ‘आमुच्या देशी निपुण कलावंतांची काय कमी? आणि काय द्यावी या गनिमाच्या साजिंद्यांची हमी? आम्हासी हे अमान्य. बिलकुल अमान्य. हा खेळ आम्ही होऊ देणार नाही..’ नासिका एकदा चिमटीत धरीत राजांनी केली गर्जना. त्यांची डावी भिवई इंचभर उंचावली. मावळ्यांप्रति संदेश गेले. तय्यार राहा. आपुणासी निखळ खळ्ळखटय़ाक ध्वनी आसमंती दुमदुमवायचा आहे. मग मावळेही सज्ज जाहले. म्यानातील तलवार ते उपसणार तोच वार्ता आली.. तह झाला.. राजांनी तह केला. तह कसला विजयच तो. अहाहा. काय वर्णावी राजांची थोरवी. जणू तहहयात तहकर्ते. कैसे हाती रुमाल बांधोन शरण आले सावल्यांचे खेळकर्ते. खात्रीस खेळ चालणार.. मात्र गनिमांच्या साजिंद्यांना आपुल्या खेळात घेण्याचे जे पातक केले खेळकर्त्यांनी त्यासाठी तयांना प्रायश्चित्त घ्यावे लागणार. राजांच्या या मुत्सद्दीगिरीवर अवघा मुलुख फिदा. ज्या गडावर तहकाम झाले त्या गडाच्या जहागीरदारांनीही राजांच्या मुखी या यशासाठी नागपुरी संत्रामिष्टान्न भरवले, ऐशी चर्चा. राजांच्या या तेजोमय विजयाबद्दल काही मूठभरांच्या मनात मात्र कोण कालवाकालव. राजांचे थोरले आप्त आणि जहागीरदार हे दोघे मित्रयुक्त शत्रू किंवा शत्रुयुक्त मित्र. एकमेकांसी चालेना.. एकमेकांविना भागेना, ऐशी त्यांची अवस्था. काही ठिकाणची रणधुमाळी सांप्रतकाळी सुरू जाहली आहे. त्यासाठी धाकटय़ांना बळ द्यावयाचे व थोरल्यांच्या पाठीवर वळ उठतील ऐसे पाहावयाचे ऐशी म्हणे जहागीरदारांची दक्षयोजना. थोरल्यांचे तर भलतेच. म्हणती, ‘खेळकर्त्यांकडील ऐसे प्रायश्चित्त धन म्हणजे खंडणीच. हे तर पाप. काय त्याची औकात’. ‘नागपुरी संत्रमिष्टान्न भरवणारे जहागीरदार आणि राजे यांचे हे ऐसे करावयाचे आधीच निश्चित झाले होते’, ऐसा त्यांचा वहीम. ‘यह तो होना ही था’, ऐसी भाषा त्यांनी त्यासाठी वापरलेली. पण राजांनी हे सारे मनावर न घेतलेले बरे. त्यांनी आपुले त्यांचे रयतहिताचे काम करावे, हेच खरे. दोन दिल्हे.. चार घेतिले, ही रीत खाशीच. परंतु, तहासारिखे अमोघ नाही अस्त्र दुजे. मुश्कीलवक्तास दिलास दिलाशासाठी तेच पुरे.