तब्बल २२ वर्षांनंतर सोमवारी एक वर्तुळ पूर्ण झाले. ‘बडे बडे देशो में, छोटी छोटी बाते होती रहती है’ हे वाक्य एका चित्रपटात अभिनेता शाहरुखने उच्चारले आणि पुढे अनेकदा त्याचा विनोदाने वापर केला गेला. महाराष्ट्रात एका घटनेनंतर राज्याचे तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी ते वाक्य उच्चारले आणि त्यातून उठलेल्या राजकीय वादळात आबांचे मंत्रिपद गेले. सोमवारी याच वाक्याचा वापर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांनी केला, आणि शाहरुखपासून सुरू झालेल्या या वाक्याचे वर्तुळ शहा यांच्या वक्तव्याने पूर्ण झाले. अमितभाई हे या संघाच्या परंपरेचे निष्ठावान पाईक! कदाचित त्यांचे बालपण संघाच्या- म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या- शाखेत मैदानावरील मंडलाकार शिशुसंस्कार वर्गात गेले असावे. संघाच्या शाखेत शिशूंसाठी एक खेळ खेळला जातो. संघटनेस अपेक्षित असा मनोविकास शिशू अवस्थेतच साधावा हा त्या खेळाचा उद्देश! मंडलातील पहिल्या शिशूच्या कानात शाखाशिक्षक एक लांबलचक निरोप सांगतो. हा शिशू तो निरोप उजवीकडच्या शिशूच्या कानात, मग तो पुढच्या शिशूच्या कानात असा सांगितला जातो. अशा तऱ्हेने शेवटच्या शिशूला तो निरोप मिळेपर्यंत त्याची बरीच मोडतोड झालेली असते. तद्वतच, २२ वर्षांपूर्वी शाहरुखने उच्चारलेल्या त्या वाक्याचे वर्तुळ अमितभाईंच्या वाक्याने पूर्ण केले. राजकारणाच्या वर्तुळात हा खेळ खेळला जातो, तेव्हा तो शाखेतील शिशूंचा खेळ राहात नाही. तरीही अमितभाईंनी हे वर्तुळ पूर्ण करताना, वाक्याची मोडतोड केलीच, आणि चित्रपटातील एका विनोदी वाक्याला राजकीय गांभीर्याची झालर चढविली. आर. आर. आबांनी ते वाक्य हुबेहूब उच्चारले, तरीही त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली होती. अमितभाई तर राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा मोहरा.. त्यामुळे त्यांच्या वाक्याचे वजनही मोठे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशात, त्यांच्याच मतदारसंघात सत्तरहून अधिक निष्पाप बालकांचे बळी घेणारी दुर्घटना घडली, आणि स्वातंत्र्यदिनाच्या आनंदावरही विरजण पडून सारा देश शोकात बुडाला. याच दुर्घटनेने अमितभाईंच्या मनातील अशा दुर्घटनांच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या, आणि भारतासारख्या मोठय़ा देशात याआधीही अशा दुर्घटना घडल्या आहेत, हेही त्यांना आठवले. अमित शहा यांच्या संवेदनशील मनात अशा दुर्घटनांच्या स्मृतींनी केवढी गर्दी केली असावी, याचेच हे मूर्तिमंत उदाहरण!.. सामान्य माणसे एखाद्या जीवघेण्या दुर्घटनेनंतर आसवे ढाळतात, दुख व्यक्त करतात, आणि परस्परांसोबत दुख वाटून घेतात. अमितभाईंचे मन तर त्याहूनही संवेदनशील असले पाहिजे. अखेर, राज्यकर्त्यांना आसवे पुसावी लागतात, त्यांना पुढे जायचे असते. जुन्या दुर्घटनांच्या आठवणीतच एखाद्याचे अश्रू आटून गेले असतील, तर नव्या दुर्घटनांचे दुख कसे कुरवाळत बसणार?.. अमितभाईंची संवेदनशीलता पाहून उभा देश कोणत्या भावनेने भारावून गेला असेल याची कल्पनादेखील करणे सामान्यांच्या आकलनापलीकडचे असेल!