आमचे पंतप्रधान सांगतात ते खरे आहे. या देशात पूर्वी ज्या गोष्टींना चमत्कार म्हणून मानले जायचे, त्याच गोष्टी पाश्चात्त्यांनी पुढे आणल्या तर मात्र, संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणून त्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली जाते. आपल्याकडे, तंत्रज्ञानालाही तोंडात बोट घालायला लावेल असा एखादा नवा आविष्कार उदयाला आला तर त्याची मात्र ‘जुगाड’ म्हणून संभावना केली जाते. भारताच्या प्राचीन परंपरेतील अनेक चमत्कारांची अशाच मानसिकतेमुळे उपेक्षा झाली आणि त्यामागचे ज्ञानही केराच्या कुंडीत कुजत राहिले. आपल्या परंपरांमध्ये जागोजागी आधुनिक विज्ञानाचे प्राचीन आविष्कार आढळतात. आपला देश प्राचीन काळापासून किती प्रगत व पारंगत होता, हेच आज आपले आदरणीय नेते अभिमानाने सांगतही असतात. आपण मात्र, पाश्चिमात्यांच्या कौतुकात आकंठ बुडालेले असतो. मोराचे अश्रू पिऊन मोरणी गर्भवती होते, हे आपल्याकडच्या अप्रगत अशा आदिम जमातीलादेखील माहीत असलेले निसर्गाचे गुपित आजवर जगाला माहीतदेखील नव्हते, यातच आपल्या प्राचीन प्रगतीचा पुरावा दडलेला दिसतो. अशा किती तरी गोष्टी आपण जगाच्या ध्यानात येण्याआधीच अमलातदेखील आणलेल्या असतात. त्या कुणा आर्किमिडीजला वस्तुमानाचा शोध लागल्यावर तो आदिम अवस्थेतच ‘युरेका’ म्हणत घरभर धावत सुटला आणि त्यामुळे त्याचा तो अतिसामान्य शोध जगभर गाजला, पण ते तर आपल्याला कधीपासूनच माहीत होते. आजही आपण त्याच, परंपरागत ज्ञानाचाच वापर करत आहोत. देशात डिजिटल युग सुरू झाले, देशाचा कानाकोपरा डिजिटल क्रांतीमुळे उजळून निघाल्याचा दावा केला जाऊ लागला, तरी त्यात काही त्रुटीदेखील राहिल्याच. ते साहजिकही आहे. एका रात्रीत कुठलीच क्रांती होत नसते. घरोघरी मोबाइल आले. पण अशा काही आधुनिक तांत्रिक त्रुटींमुळे मोबाइलचे नेटवर्क मात्र कानाकोपऱ्यात पोहोचले नाही. आपल्या जुगाड संस्कृतीने ही त्रुटी केव्हाच ओळखल्याने, ग्रामीण भागातील आमचे आर्किमिडीज या त्रुटीवरही मात करणार, ही तर आमची परंपराच आहे. भक्कम मोबाइल नेटवर्कसाठी जागोजागी टॉवर उभे करण्याची गरज असते, पण तसा दावा करणाऱ्या कंपन्यांनाही ते फारसे महत्त्वाचे वाटले नाही, कारण त्यांचा या देशातील जनतेच्या संशोधक वृत्तीवर विश्वास आहे. टॉवर नसला तरी आमचे अडत नाही, हे राजस्थानातील बिकानेर जिल्ह्य़ातील धोलिया नावाच्या खेडेगावाने सिद्धही केले. एका शिडीवरून झाडाच्या शेंडय़ापर्यंत पोहोचले की तेथे नेटवर्क मिळते, हा शोध खरे म्हणजे सामान्य नाहीच!.. असाच शोध पाश्चिमात्य देशात कुणी लावला असता, तर त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली असती. धोलियाच्या गावकऱ्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यालाच या शोधाचे प्रात्यक्षिक दाखविल्याने आता आपल्या परंपरागत बुद्धिकौशल्याला आणि संशोधक वृत्तीला सन्मानाची वागणूक मिळेल अशी आशा करायला हरकत नाही, आणि डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यातही अशा त्रुटींचे अडथळे येणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं?