अरे, हे काय चाललंय? मी गेली ४७ मिनिटे एकटाच अखंड बोलतोय. एवढा जीव काढून तुम्हाला चार भल्याच्या गोष्टी सांगतोय, पण माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्षच नाही, असं वाटतंय. आणि कोण ते सारखं मधेमधे ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले’ ही तुकाराम महाराजांची ओळ हळूच पुटपुटतंय? माझं तुम्हाला सांगणं इतकंच होतं की फार बोलू नका. मान्य आहे मला की विरोधात असल्यानं बोलायची सवय लागलीये तुम्हाला. समोर माइक दिसला की तुमच्या स्वरयंत्रातील पेशी आपोआप उद्दीपित होऊन तुमच्या मुखातून शब्द, वाक्यं आपोआप घरंगळत बाहेर पडतात, हे ठाऊक आहे मला. पण आता त्यावर नियंत्रण ठेवायला हवं. अशा वेळी माइककडे लक्ष द्यायचं नाही, म्हणजे मग बोलणं सुचणार नाही. कोण ते ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले’ पुन्हा पुटपुटलं? असो. आता ही आत्मश्लाघा होईल, स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेतल्यासारखं होईल, पण तशी सिद्धी मी प्राप्त केली आहे. तुमच्यासारखं ऊठसूट मी माझ्या स्वरयंत्राला कामाला लावत नाही. आपल्या भोवताली सतत काही ना काही घडत असतं. तुमच्यातलं कुणी तरी नको ते बोलतं. राजस्थानात म्हणा, उत्तर प्रदेशात म्हणा, कुणाचा तरी हात कुणावर तरी उठतो. एखादा दुर्दैवी जीव प्राण गमावून बसतो. हे असं काही घडलं ना की त्यावर मी सखोल विचार करतो. चिंतन-मनन करतो. दीर्घ काळ मौनात जातो. मौनकाळात मनाची आंदोलनं तपासतो. त्या आंदोलनाच्या सावल्या तपासतो. हे सगळं झाल्यानंतर मनानं आज्ञा दिली तरच मग त्या मौनाचं भाषांतर बोलण्यात करतो. मनानं बोलण्याची आज्ञा दिली नाही तर मी मौनातच राहतो. आता माझं हे मौन कधी कधी नाही रुचत कुणाला फारसं. त्यावर टीका होते, टिप्पणी होते. पण मी त्याने माझ्या मनाची शांती ढळू देत नाही. त्या टीकेकडे, टिप्पणीकडे स्थितप्रज्ञाप्रमाणे पाहतो. हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे तुम्ही यातून काही तरी शिकायला हवं. आणखी एक मुद्दा. आपल्या मनात जी गोष्ट असते ती नेहमी आपणच बोलायला हवी, असाही नियम नाहीये ना. या हृदयीचे त्या हृदयी घालून मग आपल्याला सांगायचं ते दुसरा सांगू शकतोच की. चौसष्ट कलांपैकी ती एक कलाच आहे. तीही शिकून घ्या तुम्ही. अरेच्चा! कोण ते पुन्हा तुकारामांची आठवण काढतंय? मी काय सांगतोय तुम्हाला. जरा गप्प बसायला शिका म्हणून. तरी पण तुमची गडबड सुरूच आहे मधेमधे. ही अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही सांगून ठेवतो. गेली ७३ मिनिटं मी एकटा एवढा बोलतोय त्याचं तुम्हाला काहीच नाही कसं? अजिबात चालणार नाही.. मुळीच चालणार नाही.. आता एकदम शांतता हवी.. एकदम शतप्रतिशत शांतता..