राजकीय नेत्यांनी आता दारिद्रय़ पर्यटन करायचे की नाही, हा एक ज्वलंत प्रश्न आता संपूर्ण देशासमोर निर्माण झाला आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार ‘अवतरल्या’नंतर पर्यटनास खूपच प्रोत्साहन मिळाले हे सर्वाना माहीतच आहे. खुद्द मोदी यांना पर्यटनाची खूपच आवड आहे. असे असताना राजकीय नेत्यांच्या दारिद्रय़ पर्यटनामध्ये अडथळे येत असतील तर ते अक्षम्य आहे. या पर्यटनामुळे नेत्यांना देशातील गरीब लोक जवळून पाहायला मिळतात. ते काय खातात ते चाखून पाहता येते. पुनर्रचित इतिहासानुसार याचा प्रारंभ राहुल गांधी यांनी केला. त्यावर खुद्द मोदी यांनी सणसणीत टीका केली होती. कारण तेव्हा देशात चांगले दिवस नव्हते. आता चांगले दिवस आले आहेत. अशा काळात असे पर्यटन केले तर पुण्यच लाभते म्हणतात. त्यानुसार भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालात, तेही थेट नक्षलबारीत जाऊन दारिद्रय़ पर्यटन केले. राजू महाली आणि गीता महाली या आदिवासी जोडप्याच्या झोपडीत त्यांनी केवळ पवित्र पायधूळच झाडली नाही, तर तेथे चूळही भरली. यात काडीमात्र राजकारण नव्हते. कोणतेही नियोजन नव्हते. म्हणजे शाह यांना भूक लागली. जवळच ती झोपडी होती. ते तेथे गेले. म्हणाले, मित्रों, आहे का काही खायला? त्या बिचाऱ्या आदिवासींनी भारतीय संस्कृतीला जागून त्यांना भाकरतुकडा वाढला. त्याची छान छायाचित्रे मग देशभरात प्रसिद्ध झाली. किती सुंदर होता तो सर्व भोजन सोहळा. तो झाल्यानंतर काही दिवस ते दोघे आदिवासी छान गायब झाले होते. प्रसिद्धीचा झोत बहुधा सहन झाला नसावा त्यांना. अन्यथा त्यांना पळून जाण्याचे कारण ते काय? तिकडून आल्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तो अर्थातच ममतादीदींच्या मायाळू कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळेच. तर भाजपचे स्थानिक नेते म्हणू लागले की त्यांनी घाबरून तृणमूलमध्ये प्रवेश केला. पण प्रवेशाच्या वेळी तर त्या जोडप्याच्या डोळ्यांत चक्क अश्रुधारा होत्या. त्या आनंदाच्याच होत्या असे मानणे भागच आहे. पण त्यावरून आता भाजप आणि तृणमूलमध्ये वाद सुरू झाला आहे. अशा वादामुळे या देशातील दारिद्रय़ पर्यटनाचे नुकसान होणार आहे याचे भानही त्यांना राहू नये हे आश्चर्यकारक आहे. खरे तर सर्वानाच हे पर्यटन आवडते. त्यासाठी तर सर्वानी मिळून या देशात तशी पर्यटनस्थळे जतन केली आहेत. तेथील गरीब, आदिवासी वगैरे ‘हेरिटेज’ गोष्टी टिकल्याच पाहिजेत. या अशा भांडणामुळे उद्या त्यांनाच ‘शेळी जाते जिवानिशी’ ही म्हण आठवली, तर खाणाऱ्यांचे काय होईल याचा तरी विचार या भांडखोरांनी केला पाहिजे.