मुंबईतील उपनगरी रेल्वे गाडय़ा ऐन सकाळी भरभरून गर्दीने वाहत असतात. ज्यांचे पोट सकाळच्या मस्टरवर चालते अशा सामान्यांकडे त्यातून प्रवास करण्याखेरीज पर्यायच नसतो दुसरा. त्यावर मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयाने उपाय सुचवला होता की, मुंबईतील कार्यालयांच्या वेळाच बदलता येतात का ते पाहावे सरकारने. कल्पना किती छान. पण सरकारने अद्याप त्यावर काही विचार केलेला दिसत नाही. मुंबईतील उपनगरी गाडय़ांसोबतच मुंबईच्या रस्त्यांवर तुडुंब गर्दी असते ती वाहनांची. खुडकुडय़ा वा बऱ्या अवस्थेतील बसगाडय़ा, चकाचक-झुळझुळीत मोटारी, दुचाक्या यांचा एकच कल्लोळ उडालेला असतो रस्त्यांवर. विशेषत सकाळी व संध्याकाळी तर या कल्लोळाचा डेसिबल चांगलाच अधिकचा. तर, मुंबई उच्च न्यायालयाने त्यावरही उपाय सुचवला आहे राज्य सरकारला, की एका कुटुंबाकडे किती वाहने असावीत, यावर काही मर्यादा घालता येईल का ते बघावे. खरे तर ठाण्यातील घोडबंदर रोड, पुण्यातील लक्ष्मी रोड, नागपुरातील बर्डी भाग आदी ठिकाणच्या रस्त्यांवरील गर्दी म्हणजे मुंबईच्या रस्त्यांवरील गर्दीची छोटीमोठी प्रतिकृतीच. तिथेही वाहतुकीची समस्या आहेच. असे असले तरी एका घरटी वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा विचार करण्याची सूचना फारशी रास्त वाटत नाही. घरटी माणसांपेक्षा वाहने अधिक असल्याने जे काही फायदे होतात, त्याकडे न्यायालयाचे लक्ष गेलेले दिसत नाही. ज्यांच्याकडे वाहनांचे असे भरभक्कम बळ असते त्यांची समाजात, गेलाबाजार इमारतीत तरी किती वट  असते, हे न्यायालयास काय ठावे. गाडय़ांच्या पार्किंगवरून होणारी भांडणे, मारामाऱ्या, डोकेफोड या तर दुय्यम गोष्टी. खरे तर माणसाला मानसिक तसेच शारीरिक बळ अजमावण्याची संधीच मिळत असते त्यातून. पुढचा मुद्दा वाहतूक कोंडीचा. तर शहरांतील आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात माणसाला एकांत मिळणे किती दुरापास्त. पण वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनधाऱ्यांच्या पदरात असा एकांत अगदी विनासायास पडतो. त्या एकांताचा, वेळेचा सदुपयोग ते चिंतनासाठी करू शकतात. भोवतालचा कोलाहल म्हणजे जणू आयुष्याचे प्रतीक आहे. कोलाहलातून गेल्याखेरीज आयुष्याचा अर्थ गवसत नाही, असा साक्षात्कार त्यांना होऊ शकतो तो वाहन गराडय़ात अडकलेल्या स्थितीतच. घरून उशिरा निघाल्याने कार्यालयास जाण्यास उशीर झालेल्यांसाठी वाहतूक कोंडी हा केवढा            मोठा आधार. ‘किती वेळ एकाच जागी अडकलो होतो. बस चाकभर हलेल तर शप्पथ..’ असे वरिष्ठांना सांगून लेटमार्कची लाल रेष वाचवता येते. वाहनांची एकमेकांशी प्रेमाने लगट झाल्यानंतर उद्भवणारी वाहनचालकांची प्रेमाची भांडणे सोडवताना वाहतूक पोलिसांना आपल्या वजनाची मोठय़ा जिव्हाळ्याने जाणीव करून देता येते. एक ना अनेक, रस्त्यांवर वाहनांची गर्दी असण्याचे असे असंख्य फायदे आहेत. त्यामुळे, त्यावर नियंत्रण आणण्याची भलती सूचना न्यायालयाने करू नये आणि सरकारने त्यावर विचारही करू नये. ‘वाहू देत वाहने’ असेच धोरण त्यांनी ठरवावे. तेच रास्त.