या इतिहासाभिमानी महाराष्ट्राला झाले आहे तरी काय? चारशे वर्षांपासून नसानसांत भिनलेल्या इतिहासाचा महाराष्ट्राला विसर पडू लागला, की परंपरांचा पाईक होण्याचे प्रयत्न करण्याची प्रतिज्ञाच विस्मृतीच्या गर्तेत गटांगळ्या खाऊ  लागली? इतिहासाच्या पानोपानी दडलेले पूर्वदिव्य जतन करून ठेवण्यासाठी शतकांपासून सुरू असलेल्या पूर्वसुरींचा वारसा चालविणाऱ्या जाणत्यांच्या प्रयत्नांनाच लगाम बसावा, असे कोणते गारूड महाराष्ट्राच्या पुरोगामी मनावर झाले आणि इतिहासाचे चक्रच जणू उलटे फिरू लागले?.. महाराष्ट्राच्या राज्यकारभाराचा गाडा असा अचानक उलटा का झाला?.. हे असेच होत राहिले, तर सह्याद्रीच्या कडेकपारी घुमणारे इतिहासाचे पोवाडे यापुढे निष्प्रभच होणार की काय?.. छत्रपतींचा हा महाराष्ट्र कुणा कोपऱ्यातल्या एखाद्या संस्थानातील किरकोळ फडणवीशीच्या हाती चालला असेल, तर तो सावरण्याची हीच योग्य वेळ आहे, आणि विस्मृतीच्या कप्प्यात इतिहास गुंडाळू पाहणाऱ्या मऱ्हाटी जनतेला जागे करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे, याची जाणीव कुणा जाणत्या राजाला झाली, तर त्यात काय चुकले?.. अखेर सह्याद्रीच्या कडेकपारी दडलेल्या इतिहासाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला असताना, मर्द मावळ्यांनी गप्प राहून कसे चालेल? हा इतिहास जसा आहे, तसाच जपला पाहिजे या जाणिवा जाग्या करणे हे तर आपले कर्तव्य आहे. ते करीत असताना कुणाला काय वाटेल याची चिंता करीत राहिले, तर ती इतिहासाच्या निष्ठांशीच प्रतारणा ठरेल. हे ओळखून आता कुणी पुढे आले, तर त्यावर जातीयतेचा संकुचित शिक्का मारण्यासाठी काही महाभाग पुढे सरसावतीलही, पण त्याला सामोरे जाऊन इतिहासाची पुनस्र्थापना करण्याची हिंमत दाखविलीच पाहिजे. या महाराष्ट्राच्या इतिहासावर छत्रपतींची मोहोर उमटलेली असताना, एखादे फडणवीस पुढे येतात आणि छत्रपतींनाच आश्रय दिल्याच्या थाटात त्यांची नियुक्ती करतो, ही वर्तमानाकडून सुरू झालेली इतिहासाची घोर प्रतारणाच म्हणावी लागेल. पूर्वीच्या काळी छत्रपती हे पेशव्यांची नियुक्ती करायचे, आणि हे पेशवे फडणवीसांची नियुक्ती करायचे. आता महाराष्ट्राच्या राजकारणात उलटेच होऊ  लागले आहे. चारशे वर्षांपूर्वी बसविली गेलेली राजकारणाची सारी घडीच उलटीसुलटी होऊ  लागली आहे.. इथे तर फडणवीसच छत्रपतींची नियुक्ती करू लागले आहेत. वर्तमानातल्या जाणत्या राजांची ही चिंता पाहता, राजकारणाचा गाडा काही ठीक नाही, याची          जाणीव महाराष्ट्राला होऊ  लागली असणारच. हे पुन्हा पूर्वपदावर आणले पाहिजे. त्यासाठी पुन्हा मतांचे ध्रुवीकरण हाच सिद्धांत भक्कम केला पाहिजे, आणि त्यासाठी आजच्याएवढी योग्य वेळ दुसरी नाही. महाराष्ट्राचे राजकारण रुळावर आणावयाचे असेल, तर इतिहासाचे उलटे चक्र थांबविले पाहिजे. त्यासाठी मतांचे जातवार ध्रुवीकरण हाच मार्ग आहे, आणि ‘फडणवीशीतील यादवी’ पाहता, हीच योग्य वेळ आहे.. जाणत्या राजाखेरीज कोणीच हे जाणू शकत नसेल, तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.