तीन सालांमागे प्रधानसेवक मोदी दिल्लीत सत्तानिवासी झाल्यानंतर देशाचे चित्र पार बदलून गेले. देश स्वच्छ झाला.. बलशाली झाला.. तेजोमय झाला. सर्वत्र अच्छे दिनचे फलक झळकले. हे असे अच्छे दिन आल्यानंतर सर्वाधिक पंचाईत झाली ती किरकिऱ्या लोकांची. या किरकिऱ्या लोकांना काही म्हणून काहीही चांगले दिसत नाही. अगदी साधे रस्त्यांचे उदाहरण घ्या. केवढे लांबच लांब आणि रुंदच रुंद रस्ते असतात आपल्याकडे. त्यास पावसाळ्यात कुठे तरी छोटी छोटी छिद्रे पडतात. हे किरकिरे लोक त्यांस खड्डे म्हणतात आणि उगाच गाणीबिणी रचतात त्यावर. माणसाने कसा छान पाऊस बघावा, इंद्रधनुष्य बघावे, कांद्याची भजी खात त्यावर कुरकुरीत कविता करावी. पण नाही. आता या शहजाद पूनावाला यांचेच घ्या. हे गृहस्थ काँग्रेसवाले. परवा संसदेसमोरच त्यांना धरणे धरायचे होते आणि तेही तोंडाला काळी पट्टी बांधून. कशासाठी? तर म्हणे, ‘देशात गोरक्षक हिंसाचार माजवतायत’.

देश सोनेरी विकासाच्या हमरस्त्यावर तुफान वेगाने घोडदौड करीत असताना उगाच कशाला हा गायींचा विषय. ते बसले आपले तोंडाला पट्टी बांधून. तेथील बंदोबस्तावरील पोलीसदादांनी आस्थेने चौकशी केली, की ‘ही काळी पट्टी कशासाठी?’ तर म्हणतात कसे, ‘आम्ही महात्मा गांधी यांच्यासारखे आंदोलन करीत आहोत.’ त्यावर पोलीसदादाने समजावले त्यांना, की बुवा, गांधीजी निघून गेलेत आपल्यातून आता. त्यांच्यासारखी आंदोलने करू नका आता. एवढा प्रेमळ सल्ला दिला त्या पोलीसदादाने तर या पूनावालांनी त्याचे चित्रीकरणच समाजमाध्यमांवर टाकले आणि त्यासोबत टीकेचा सूरही. आता काय वावगे बोलले पोलीसदादा यात? गांधीजी गेले आपल्यातून त्याला जमाना झाला. त्यामुळे त्यांच्या स्टाइलची आंदोलने आता बादच करायला हवीत. काही नवीन मार्ग शोधून काढायला हवेत ना. या किरकिऱ्या मंडळींना तेही शोधता येत नाहीत. गांधीजी आयते हाती मिळतात.. मग करा वापर त्यांचा.

मुळात भोवतीची परिस्थिती आता इतकी उत्तम आहे की अशा आंदोलनांची गरजच नाही. तरीपण तुम्हाला वाटतेय तर अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी काही नवीन रीत शोधा की. ते भाजपचे लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड हे किरकिरे जमातीत बसत नसले तरी यांच्याही कानांवर ही गोष्ट घालायला हवी. दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात या गायकवाडांना अपमानास्पद वागणूक मिळाली. मग द्यायची चांगली कानशिलात लगावून. पण गायकवाड एकदम अहिंसक वृत्तीचे. ‘मी गौतम बुद्धांचा शिष्य नसतो तर तेथील कर्मचाऱ्यांच्या कानाखाली लगावली असती,’ असे तेच म्हणाले. त्यांनी फक्त तक्रार केली आणि मग दोन कर्मचाऱ्यांची नोकरी गेली एवढेच. काय हे गायकवाड? अहिंसक मार्गाने अन्यायाविरोधात दाद मागण्याचा मार्ग कालबाह्य़ झाला. काही तरी नवीन मार्ग शोधायला हवा. किती काळ बेकं बेचे जुने परोचे घोकत बसणार? ते जुने परोचे आता पुरे झाले..