गरिबी आणि निवडणुका यांचा परस्परांशी निकटचा संबंध असतो. गरीब माणूसदेखील निवडणुकीच्या काळात ‘मतदार राजा’ होतो, आणि पाच वर्षे त्याच्याकडे पाठ फिरविणारे सारे त्याच्यासमोर कंबर झुकवून उभे राहतात. असे झाले, की दु:खे विसरल्याची, वेदना संपल्याची आणि ‘अच्छे दिन’ आल्याची स्वप्ने तो दिवसादेखील पाहू शकतो आणि तो त्या स्वप्नात मश्गूल झाला की तात्पुरता का होईना, गरिबीचा विसर पडतो. खरे तर, गरिबी ही एक मानसिक अवस्था असते, असे राहुल गांधींचे मत आहे. पण निवडणुका आल्या की हा सिद्धान्त विसरावा लागतो आणि या मानसिक अवस्थेवरील ‘भौतिक उपाय’च शोधावे लागतात. पोटभर अन्न, सावलीपुरता निवारा आणि अंग झाकण्यापुरते वस्त्र ही गरिबाची गरज असते. ही गरज कोण भागवते याच्याशी किंवा भुकेल्या पोटात जाणाऱ्या अन्नाचा घास कुणाच्या नावाचा आहे याच्याशीही त्याला देणेघेणे नसते. पण निवडणुकीच्या काळात मात्र, याच नावास महत्त्व येते. ‘दाने दाने पे लिखा है, खानेवाले का नाम’ अशी एकेकाळी म्हण प्रचलित होती. निवडणुकीच्या काळात मात्र संदर्भ बदलतात आणि ‘दाने दाने पे लिखा है, देनेवाले का नाम’ असे होऊ लागते. काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आता तेथील राजकारणात सगळ्याच राजकीय पक्षांचे ‘सुगीचे दिवस’ सुरू होतील. गरिबासदेखील राजाचा मान मिळेल आणि आपल्या गरिबीचा त्याला तात्पुरता विसर पडेल अशा वातावरणनिर्मितीची स्पर्धा सुरू होईल. राहुल गांधींच्या हस्ते कर्नाटकात काँग्रेसने या वातावरण निर्मितीनाटय़ाचा प्रारंभ केला. ‘भूकमुक्त कर्नाटका’चा संकल्प मुख्यमंत्री सिद्धरामैयांनी सोडला आणि राजधानी बेंगळूरुमध्ये राहुलजींच्या हस्ते ‘इंदिरा कँटीन’चे उद्घाटन केले. शेजारच्या तामिळनाडूमध्ये अम्मा जयललितांनी २०१३ मध्ये राज्यभर सुरू केलेल्या ‘अम्मा कँटीन’ची कीर्ती सर्वदूर पसरलेली असल्याने, राहुलजींना ऐनवेळी इंदिरा कँटीन हे नाव आठवलेच नाही आणि राहुलजींनी कर्नाटकातील काँग्रेसच्या योजनेचे अम्मा कँटीन असे नामकरण करून टाकल्याने काँग्रेसजन बुचकळ्यात पडले. या योजनेतून भुकेल्या पोटांना मिळणाऱ्या अन्नाच्या दाण्यावर इंदिराजींचे नाव असावे यासाठी धडपडणारे काँग्रेसचे चेहरे चिंतेने काळवंडले आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकातील ‘दाने दाने पे’ लिहिलेले इंदिराजींचे नाव शुभारंभालाच पक्षाच्या उपाध्यक्षाच्या हस्ते असे पुसले गेल्याने कर्नाटकी काँग्रेसजनांच्या तोंडचे पाणीही क्षणकालासाठी पळाले. त्या भुकेल्या गरिबाला ‘इंदिरा’ काय आणि ‘अम्मा’ काय.. तरीही, त्याची भूक भागविणाऱ्या दाण्यावरचे नाव ‘अम्मा’ नव्हे, ‘इंदिरा’ आहे हे आता त्याला मतदानाच्या क्षणाआधी कळावे यासाठी पुन्हा साऱ्यांना कंबर कसावी लागेल. शेवटी गरिबी ही मानसिक अवस्था असली तरी भूक ही भौतिक अवस्था आहे आणि ती भागविणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक कणाला त्याचे श्रेय मिळणे ही निवडणुकीच्या काळाची राजकीय गरज आहे!