आता तरी लक्षात आले का? नसेल आले तर आजचे वृत्तपत्र तूर्तास बाजूस ठेवा आणि कालची वृत्तपत्रे काढून पुन्हा वाचा एकदा काळजीपूर्वक. पहिले पान बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील बातमी वाचा नीट. खरे तर ती आहे नाशिक जिल्ह्य़ातील नैताळे गावच्या शेतकऱ्यांनी जी ‘मन की बात’ केली त्याची. सरसकट कर्जमाफीबाबत तर शेतकरी रोजच बोलत असतात, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या समृद्धी महामार्गास असलेल्या विरोधाबाबत ते रोजच सांगत असतात; पण रविवारी नैताळेमधील शेतकऱ्यांनी ते बोलता बोलता जी कृती केली ती महत्त्वाची आहे. आपले प्रश्न फडणवीस सरकार सोडवीत नाही, याचा निषेध करायचा होता त्यांना. त्यासाठी त्यांनी निवडला अतिशय शुद्ध, अहिंसक मार्ग. मुख्यमंत्र्यांच्या गाडय़ांचा आलिशान ताफा रस्त्यावरून गेल्यानंतर तो रस्ताच धुतला शेतकऱ्यांनी. ही स्वच्छता मोहीम त्यांनी राबविली ती साध्यासुध्या पाण्याने नव्हे, तर गोमूत्राने. सदरहू टिपणाच्या प्रारंभीच आम्ही सवाल केला होता की, ‘आता तरी लक्षात आले का?’ असा. या सवालात ‘लक्षात आले का?’ अशी जी पृच्छा आहे ती गोमूत्राच्या महत्तेविषयी आहे. म्हणजे, ‘आता तरी गोमूत्राचे महत्त्व लक्षात आले का,’ असे आम्हांस विचारायचे आहे. केंद्रातील मोदी सरकार गोमूत्राचे महत्त्व सामान्यांना समजावून सांगण्यासाठी दाताच्या कण्या करते आहे. थोर थोर वैज्ञानिकांची समिती गाईच्या पंचगव्यावरील अभ्यासासाठी अहोरात्र कष्ट उपसते आहे; पण काही मूढजनांना त्याची कदरच नाही मुळी. (वैज्ञानिकांच्या समितीचा अहवाल आला म्हणजे कळेल म्हणावे.) गोमूत्र आदी विषय आले की, या मूढजनांचा सूर टिंगलीचा होतो आणि शब्द होतात टवाळखोर. अशांसाठी नैताळेतील रस्तेसफाई म्हणजे डोळ्यांत घातलेले देशी अंजनच आहे. केवळ भौतिक पातळीवरच नव्हे, तर आत्मिक पातळीवरील सफाईची जबरदस्त ताकद गोमूत्रात आहे. त्याखेरीज शेतकरी मंडळी त्याचा उपयोग करते ना. सरसकट कर्जमाफी, समृद्धी महामार्ग विरोध यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या आणि राज्य सरकारच्या मनात ज्या नकारात्मक भावना आहेत त्यांचे तुषार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या मार्गावर उडालेले असणारच. अशा मार्गाचे शुद्धीकरण करायचे म्हणजे त्यावर गोमूत्राचे शिंपण करण्याखेरीज पर्याय नाही. तेच शेतकऱ्यांनी केले. त्यातून केवळ तो मार्गच शुद्ध झाला असे नव्हे, तर सरकार-धुरीणांच्या मनातील याबाबतचे नकारात्मक विचारही त्याने दूर होण्यास मदत होईल, असा ठोकताळा बांधण्यास हरकत नाही. येत्या काही दिवसांत त्याचा प्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही. नकारात्मकता दूर सारून तेथे सकारात्मकतेची प्रतिष्ठापना करण्याची ताकद हे गोमूत्राचे वैशिष्टय़. गोमूत्रातून निघणाऱ्या लहरी व त्यांचे तरंग यांचा सकारात्मक परिणाम होतोच होतो. प्राचीन, पुरातन व अस्सल या मातीतले असे हे ज्ञान आहे हे. सरकारने किती वेळा सांगून झाले हे; पण (आंदोलक शेतकरी वगळता) लक्षात कोण घेतो?