चावडीबाहेरच्या पारावर जमलेल्या तमाम गावाच्या नजरा स्टुलावरच्या टीव्हीवर खिळल्या होत्या. सरपंचांच्या हस्ते टीव्ही सुरू करण्यात आला आणि पडद्यावर व्हाइट हाउस झळकले. ते पाहताच बंडय़ाचे डोळे चमकले. ‘मी हे बघितलंय!’ तो ओरडला. शेजारच्या तात्यांनी डोळे वटारले. ‘ते कोपरखैरणेतलं गणेश नाईकांचं घर. गप्प बस!’ बंडय़ा गप्प बसला. ट्रम्पदादाचे भाषण सुरू झाले. पण तो इंग्लिश बोलत होता. मग रावसाहेब पुढे आले. त्यांना इंग्लिश समजायचे. त्यांनी भाषणाचे मराठीत भाषांतर करून सांगायला सुरुवात केली.. ‘भाईयों-बहनों’.. रावसाहेबांनी ठेवणीतला आवाज काढला आणि जीभ चावली. तोवर ट्रम्पदादा आणखी पुढे गेला होता. ‘हा देश तुमचा आहे.. आपण सारे मिळून या देशाचं भवितव्य घडवणार आहोत. आजवर या देशावर फक्त वॉशिंग्टनचा वरचष्मा होता, आता ही सत्ता पुन्हा जनतेकडे आली आहे. आपण सारे मिळून अमेरिकेचे भविष्य घडवणार आहोत’.. रावसाहेबांच्या आवाजातील लय आता ओळखीची वाटू लागली होती.. ‘मित्रहो.. आजपासून जे काही आपण करू, ते देशासाठीच असेल.’.. आता मात्र गावकरी रावसाहेबांकडे संशयाने पाहू लागले. ‘हा खरंच डोनाल्डदादाचंच भाषण मराठीत सांगतोय ना?’ तात्या पुटपुटले. बंडय़ाही बुचकळ्यात पडला होता. अमेरिकेतल्या भारतीयांसाठी तीन वर्षांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मोदी हेच बोलले होते. बंडय़ाला आठवले! .. ट्रम्पदादाकडे पाहताना सगळ्यांचे कान रावसाहेबांकडे लागले होते- ‘अमेरिकेतल्याच वस्तू विकत घ्या, अमेरिकेच्याच वस्तू वापरा’ .. आता मात्र, हा मोदींचेच भाषण वाचतोय, याची तात्यांना खात्रीच पटली. ‘अरे, हा मेक इन इंडियाच्या जागी अमेरिका असे शब्द घालतोय’. तात्या बंडय़ाच्या कानात कुजबुजले.. बंडय़ाचे कान ट्रम्पदादाकडे लागले होते. ‘आता आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान बनवू या’.. रावसाहेबांनी ट्रम्पदादाचं वाक्य मराठीत सांगितलं तसा बंडय़ा ओरडलाच.. ‘मोदी, मोदी!’ – तात्यांना वाटलं आपल्याला उत्तर मिळालं! रावसाहेब बोलतच होते.. ‘अमेरिकेतल्या गावापासून शहरापर्यंत सर्वत्र, प्रत्येकाचा आवाज आता ऐकला जाईल. कुणीही उपेक्षित राहणार नाही!’ रावसाहेबांचं वाक्य संपलं, आणि बंडय़ा ओरडला, ‘सबका साथ, सबका विकास’!.. पारावर टाळ्या घुमल्या. ‘या जगातून आपण दहशतवाद हद्दपार करू या’.. ट्रम्पच्या पुढच्या वाक्याचे रावसाहेबांनी भाषांतर केले, आणि बंडय़ाच्या नजरेसमोर मोदींचे पहिले भाषण तरळले.. ‘ते वॉशिंग्टनमध्ये मजा करत होते, आणि गरीब जनता मात्र, उपेक्षितच होती!’.. ट्रम्पदादा बोलले, आणि पुन्हा बंडय़ाला आठवले, ‘माँ-बेटा राजवटीने देशाची वाट लावली’. बंडय़ा आता रावसाहेबांच्याही वरच्या आवाजात सांगू लागला. ‘आपल्या इंडियातनंच ट्रम्पदादाला व्हॉटस्यापवर पाठवलं असणार हे भाषण!’ बंडय़ाचा हा विश्वास किती सार्थ आहे, हे गावाने जाणले.. नव्हे नव्हे, अगदी अमेरिकेत- वॉशिंग्टनमध्ये ट्रम्पसमोरील गर्दीनेही टाळ्या वाजवून बंडय़ालाच जणू अनुमोदन दिले.. तोवर ट्रम्पदादादेखील हात उंचावून ‘थँक यू’ म्हणत होते..