अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्डजी ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बोरिसजी जॉन्सन अर्थात बोजो यांची निवड होणे ही आता केवळ निवडणुकीच्या औपचारिकतेची गोष्ट आहे, असे म्हटले तर तमाम उदारमतवाद्यांना घाम फुटण्याची शक्यता आहे आणि तमाम उजव्यांना आनंदाच्या उकळ्या फुटण्याची शक्यता आहे. हे झाले ब्रिटन आणि अमेरिकेतील. आपल्याकडेही याहून वेगळी स्थिती नाही. किंबहुना दिल्लीतील हिंदू सेनेचे शूरवीर तातडीने बोरिसजी जॉन्सन यांचा वाढदिवस कधी असतो, याचा शोध घेण्याच्या कामी लागले असतील. या हिंदू सैनिकांनी मध्यंतरी ट्रम्प महोदयांचा वाढदिवस मोठय़ा उत्साहाने केक कापून आणि मेणबत्त्या फुंकून साजरा केला होता. तर सांगण्याचा मुद्दा असा, की ट्रम्प आणि आपले अलेक्झांडर बोरिस डे फेफेल जॉन्सन हे ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे उच्चविद्याविभूषित नेते हे सध्या उजव्या कट्टरतावाद्यांचे कंठमणी बनलेले आहेत. असे बनण्यासाठी एक खास पात्रता लागते. ती म्हणजे हे नेते ‘सुब्रमण्यम स्वामी गुणिले शंभर’ असे असावे लागतात. तर ही पात्रता आपल्यात असल्याचे ट्रम्प यांनी वारंवार सिद्ध केले आहे. बोजो यांना तशी संधी याआधी फारशी मिळाली नव्हती. ती ब्रेग्झिट प्रकरणाने दिली. एके काळी लंडनचे महापौरपद भूषविलेला हा गृहस्थ ब्रेग्झिट प्रकरणात बोलत होता, मात्र मुंबईच्या शिवसेनाइट महापौरासारखा. म्हणजे आपली तमाम दुखे, वेदना, अवहेलना यांस जबाबदार आहेत ते हे बाहेरून आलेले लुंगीवाले, दाढीवाले वगैरे वगैरे. अवघड प्रश्नांना अशी सोपी (पण फसवी) उत्तरे देणाऱ्या वाचाळवीरांना लोक सत्यवादी, परखड वगैरे समजतात. ब्रेग्झिट चळवळीत लोकांचा बोजो यांच्याबाबत तसाच समज झाला. लोक त्यांना आपला तारणहार, ब्रिटनचे विकासपुरुष वगैरे मानू लागले. आता ब्रिटन युरोपियन संघातून बाहेर पडल्यानंतर बोजोंना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. तिकडे ट्रम्प यांनाही कुठे तरी आपण अध्यक्ष बनू की काय असे वाटू लागले आहे. म्हणून तेथील उदारमतवादी हवालदिल झाले आहेत, परंतु त्यांनी घाबरण्याची आवश्यकताच नाही. कारण सत्तासुंदरीमध्ये चारित्र्य बदलविण्याची अनोखी कला असते. तिची जादू आता ट्रम्प आणि बोजो या दोघांवरही दिसू लागली आहे. ज्या ज्या गोष्टींना त्यांनी आधी विरोध केला, टीका केली, टिंगलटवाळी केली, त्या सर्व बाबींपासून आता ते दूर जाऊ लागले आहेत. त्यांचे विचार मवाळ पडू लागले आहेत. हे म्हणजे आधी लैंगिक शिक्षणाला विरोध करणारांनी आता निरामय समाजासाठी ते कसे राष्ट्रहिताचे आहे हे जगास पटवून द्यावे, असे हे सगळे चालले आहे. उद्या याच गतीने ट्रम्प हे एखाद्या इफ्तार पार्टीत आपणांस दिसू शकतात आणि बोजो हे पोलिश नागरिकांचे ब्रिटनच्या प्रगतीतील योगदान यावर मन की बात करताना सापडू शकतात. तेव्हा ट्रम्प आणि बोजोंचे एवढेही भय बाळगण्याचे कारण नसते. तशी माणसे सत्तेवर न येणे हे उत्तम. पण आलीच तरी सत्ता त्यांना बरोबर वळणावर आणत असते.