अरेरे! रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती मेलेनिया यांच्यावर अशी मानहानीची वेळ यावी ना! तीही त्यांच्या ओळखपरेडीतच. काय बरे म्हणावे या दुर्दैवास! त्यांची चूक ती काय आणि त्यावरून झालेला गदारोळ तो केवढा! परंतु कोणी तरी विद्वान सद्गृहस्थाने म्हटलेच आहे की, राजकारण हा बदमाशांचा की तत्सम आणखी कोणाचा तरी अखेरचा अड्डा आहे. या राजकारणाने श्रीमती मेलेनिया यांच्यासारख्या गृहिणीला किती यातना द्याव्यात! त्यांना चक्क भाषणशर्विलक ठरवण्यात आले. ट्रम्पमहोदयांच्या रिपब्लिकन उमेदवारीरोहणाचा तो नयनरम्य सोहळा. अवघ्या जगाचे आणि खासकरून आपणा भारतीयांचे लक्ष त्याकडे लागलेले. ते स्वाभाविकच होते. ट्रम्प यांनी निवडून यावे म्हणून आपण येथे आपले देव पाण्यात ठेवले आहेत. अशा त्या समारंभात ट्रम्प यांनी आपल्या सुविद्य गृहिणीस रि.पा.अ. डेलिगेटांसमोर सादर केले. आंग्ल वाक्प्रचारात सांगावयाचे तर तो काही मेलेनिया यांचा चहाचा कप नव्हे. परंतु तरीही आपल्या धन्याच्या विजयासाठी त्या सरसावल्या. किती छान भाषण केले त्यांनी. ते ऐकून ट्रम्प यांच्या भारतीय पाठीराख्यांना तर आणखी अशाच एका महान वक्त्याची आठवण झाली. मेलेनिया यांचे ते सुरस वक्तव्य म्हणजे जणू ट्रम्प यांच्या विखारी वक्तव्यांवरील उताराच! परंतु हाय रे दैवा! तेथील कोणा पत्रकारास पाहवले नाही ते. अखेर हे पत्रकार म्हणजे येथून तेथून सारखेच! त्यांनी सांगितले, की मेलेनिया यांनी मिशेल ओबामा यांच्या भाषणातील काही उतारे जसेच्या तसे चोरले. झाले! सर्वानी मेलेनिया यांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले. वास्तविक त्यात त्यांचा काय दोष? चूक असेल तर ती भाषणलेखकांची. परंतु त्यांना तरी कोण काय बोलणार? ते बिचारे पडद्याआडचे कलाकार. त्यांनी भाषणे लिहावीत, छान छान घोषणा लिहाव्यात, नवनवे शब्द तयार करावेत आणि वक्त्याने ते मुखोद्गत करून वा टेलिप्रॉम्पटरांत वाचून लोकांकडून वाहवा मिळवून घ्यावी, की अहाहा! काय बरे वक्त्याचे वक्तृत्व अन् काय बरे विचार! तेव्हा मेलेनिया यांच्या शिरावर खापर फुटले ते रीतीस धरूनच झाले. परंतु हा समाजाचा दुटप्पीपणाच. आता खुद्द ट्रम्पमहोदय का कमी चौर्य करीत आहेत? ते बिल्डर आहेत म्हणून हे म्हटलेले नसून, नेत्याच्या नात्याने हे विधान केलेले आहे. ट्रम्पमहाशय यांचे तोंड म्हणजे वाफेचे इंजिनच. तेव्हा त्यांस भाषणचौर्य करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी डल्ला मारला आहे तो कूक्लक्सकन ते अ‍ॅडॉल्फ हिटलर ते अगदी तालिबानी नेत्यांपर्यंत अनेक थोर संघटना व व्यक्तींच्या विचारांवर. ते विचार घेऊन तर ते चालले आहेत. परवाच्या रिपअ संमेलनात मेलेनिया यांच्या भाषणाआधी फासिस्ट विचारांची चोरी उघडय़ावर केली गेली. त्याकडे कोणी लक्षच दिले नाही. आणि गदारोळ झाला तो बिचाऱ्या श्रीमती मेलेनिया यांच्यावरून. त्या सुविद्य आहेत. त्यांच्याकडे महाविद्यालयाची पदवीसुद्धा आहे. तरीही असे व्हावे, ही फारच दुर्दैवी गोष्ट म्हणावयाची.