आपल्या राज्याचे नाव महाराष्ट्र. ज्या राज्याच्या नावातच ‘महा’ आहे, तिथे काही बारकेसे, छोटेसे असूच शकत नाही. आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बघा वाटल्यास. सरकारच्या योजना अशातशा नसतात, त्या ‘महायोजना’ असतात. सरकारचे पोर्टल ‘महाऑनलाइन पोर्टल’ असते. नोकरभरतीसाठी ‘महारिक्रूटमेंट पोर्टल’ असते. असतो एकाएका राज्याचा नाम(महा)महिमा. या ‘महा’संस्कृतीचा विस्तार अगदी चारही दिशांना झालेला आहे. अगदी परवाचीच गोष्ट. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम तालुक्यात धावत्या दौऱ्यावर गेले होते. आता मुख्यमंत्री येणार तर त्यांचे स्वागत त्यांच्या पदाला साजेसे व्हायला हवे आणि आपले मुख्यमंत्री न थकता तासन्तास काम करण्यासाठी, श्रम करण्यासाठी प्रसिद्ध. अथक कामाची ही रीत त्यांनी बहुधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकून घेतलेली. श्रमांचे महत्त्व जाणणाऱ्या अशा मुख्यमंत्र्यांचे स्वागत तशाच धाटणीने व्हायला हवे, म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेने एक महाकल्पक योजना आखली. ही योजना होती – साध्यासुध्या नव्हे, तर – महाश्रमदानाची. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सुमारे दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावणे धाडण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा दौरा जेथे होता तेथीलच एक डोंगर निवडण्यात आला. मग ‘साथी हाथ बढाना..’ हे गाणे मनातल्या मनात म्हणत या दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महाश्रमदान केले. साधीसुधी गोष्ट नाही ही. दुपारी चारच्या टळटळीत महाउन्हात हाती कुदळ, फावडे, घमेले अशी अवजारे घ्यायची आणि चर खणायचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात (वीज असल्यास पंख्याखाली वा वातानुकूलित खोलीत) बसून कागदावर आकडेमोड वा इतर कामे करण्यासारखे साधे वाटले काय? लेखणी वा संगणकाचा मूषक (पक्षी- माऊस) दूर ठेवून मातीत उतरून ‘महाश्रम’ करणे सोपे वाटले काय? किती कष्टाचे काम हे. पण याचे कौतुकच नाही कुणाला. म्हणे ‘मुख्यमंत्री फडणवीस यांची पाठ वळताच महाश्रमाचा जोर ओसरला आणि दोन हजार अधिकारी-कर्मचारी तेथून लगेचच निघून गेले. डोंगर लगोलग रिकामा झाला.’ कौतुक न करता केवळ टीकाच करणाऱ्यांना हे कळत नाहीये की ही तर महाश्रमांची एक निव्वळ झलक होती. दुष्काळी भागाचा धावता दौरा, पूरग्रस्त भागाची हेलिकॉप्टरमधून पाहणी, प्रकल्पग्रस्तांशी तब्बल १३ मिनिटे मुद्देसूद चर्चा, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर, नक्षली समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांशी बक्कळ सात मिनिटे सर्वागीण संवाद.. हीदेखील एक झलकच असते की सरकारच्या कार्यप्रवणतेची. खरे काम त्यानंतर होते. तशीच ही एक झलक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महाश्रमांची. त्यांना असेतसे समजू नये कुणी. त्यांच्या श्रमांना कमीही लेखू नये, हिणवूही नये कुणी. परवा चर खणले, मनात आणले तर उद्या महाश्रमांतून तळेही खणतील वा डोंगर इकडचा तिकडे करून दाखवतील ही मंडळी. कामाचे डोंगर उपसायची त्यांना रोजची सवय. त्यांच्या महाश्रमांना बोल लावणारे अगदीच करंटे.. नव्हे महाकरंटे.