महाराष्ट्राचे एक वैशिष्टय़ आहे : इथे दर दहा मैलांवर भाषा बदलते; पण भाषा बदलली तरी संस्कृती बदलत नाही. आजच्या महाराष्ट्रातही सामाजिक स्तरांतील फरकाचा तपशील वगळता सवयी सारख्याच असतात. उदाहरणार्थ, दिवसभराच्या कष्टाने शिणलेला एखादा श्रमजीवी, संध्याकाळी एखाद्या गुत्त्यावर बसून ‘पावशेर मारून’ आपला शीण घालवतो, त्याच्या त्या कृतीला ‘ढोसणे’ म्हणत असतील; तर त्याच कृतीला मध्यमवर्गीयांच्या जगात ‘ड्रिंक घेणे’ म्हणून काहीसा पुढारलेपणाचा, आधुनिकतेचा मुलामा चढविला जाईल. गरीब मजुरांचा एखादा तांडा, सूर्य डोक्यावर आल्यावर हातातले काम थांबवून झाडाच्या सावलीत बसून सोबतची शिदोरी हातावर घेत चार घास ‘घशाखाली ढकलतो’, त्याच वेळी एखाद्या घरात मात्र, जेवणाची ‘पंगत’ बसलेली असते. कुठे हीच कृती थाटामाटात, ‘जेवणावळ’ किंवा ‘मेजवानी’ म्हणून साजरी होत असते. तरीही ते सारे एकच असते. ‘उदरभरण’!.. असे हे वैविध्य संस्कृतीनुसारच बदलत असते. राजकारणातील संस्कृती हा तर खमंग, चवदार चर्चेचा विषय.. येथेही प्रत्येक कृतीला नावे असतात, आणि त्याचे वेगवेगळे अर्थ असतात. खादी, खाकी, सहकार असे काही उदात्त शब्दही राजकारणातील वैविध्यपूर्ण संस्कृतीमुळे उपहासगर्भ होऊन गेले. अनेक शब्दांना राजकारणाच्या वळचणीला गेल्यामुळे कुचेष्टा सहन करावी लागली. कारण, ज्याचे त्याचे राजकारण! .. राजकीय पक्षांचीही आपली आपली संस्कृती असते. त्यानुसार त्यांच्या त्यांच्या परंपरा असतात. पण प्रथा परंपरा वेगळ्या असल्या, तरी त्यामागची भावना व कृती तीच! मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या सहभोजन परंपरेमुळे हे सारे आठवते आणि भोजन, सहभोजन, खाणे या शब्दांमागील राजकीय संस्कृतीचा मागोवाही रंजक वाटू लागतो. खादी, खाकी, अशा शब्दांमुळे, आपापली संस्कृती जपत ‘हातात हात घेण्या’च्या राजकारण्यांच्या ‘उदारपणा’ची ख्याती सामान्यांपर्यंत केव्हाच पोहोचलेली असते. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असा नारा तिकडे नरेंद्र मोदींनी दिला असला, तरी इकडे राजकारणात मात्र ‘सहभोजना’ची संस्कृती रूढ होऊ पाहत आहे. तसेही, राजकारण संस्कृतीला ‘खाणे’ नवे नसते. ‘सारे मिळून खाऊ’ ही तर त्या संस्कृतीची परंपराच मानली जाते. सर्वामध्ये समन्वय राहावा, आपलेपणाची भावना वाढीस लागावी यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी सहभोजनाची नवी प्रथा सुरू केली. या महिन्याच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर साऱ्या मंत्र्यांचा पहिला सहभोजन सोहळा पार पडला, आणि आपल्या डब्यातील वाटा दुसऱ्याला देऊन साऱ्या चवींचा सर्वानीच आस्वाद घेतला. ‘सारे मिळून खाऊ’ असा जुनाच संदेश नव्याने देणाऱ्या या कृतीमुळे आता लहानमोठय़ा बाबींवरून होणारे वाद सामोपचाराने आणि खाता खाता सोडवता येतील. असे झाले, तर सर्वाच्या पोटात जाणारे सारे काही समसमान असेल. खरेच, मग वादाचा मुद्दा येतोच कुठे?