समाजमाध्यमांइतक्याच विश्वासार्ह असलेल्या आमच्या अनधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील विविध ठिकाणच्या पालक संघटनांमध्ये पाठय़पुस्तकांबद्दल असंतोषाची भावना निर्माण झाली असून, त्याची दखल घेऊन सरकारने पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोटय़वधी पालकांनी दिला आहे. पालकांचे हे आंदोलन पाठय़पुस्तकांच्या वाढत्या किमती, तसेच त्यांचा दर्जा याविरोधात असल्याची अफवा प्रारंभी पसरली होती. मात्र मुलांच्या उत्तम भवितव्यासाठी त्यांच्यावर योग्य संस्कार झाले पाहिजेत या दृष्टीने पाठय़पुस्तकांचे पुनर्लेखन होत असून, त्यामुळे त्यांची किंमतवाढ करावी लागत असून, दर्जा राखणे कठीण झाले आहे असा खुलासा यावर पाठय़पुस्तक निर्मिती संस्थांनी, तसेच सरकारी समित्यांवरील शिक्षणतज्ज्ञ व शिक्षकांनी केला आहे. पालकांनीही या आंदोलनाचा किमतीशी संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र संपूर्ण देशभरातील पुस्तकांचा दर्जा हा राजस्थानातील पाठय़पुस्तकांप्रमाणे असावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. अंडय़ाचा डीपी असलेल्या एका पालक नेत्याने व्हॉटस्अ‍ॅपवरून दिलेल्या माहितीनुसार, तेथील बारावीच्या नव्या पुस्तकात आदर्श उद्योजक कसा असावा हे दिले आहे. उत्तम स्वास्थ्य, प्रभावशाली व्यक्तित्व, चांगली उंची, सुंदर रंग हे सर्व त्याच्यात पाहिजे. अशा माहितीमुळे मुलांना आपले करिअर निवडण्यास मदतच होते. तुम्ही उंच, गोरे नसाल तर उद्योजक कसे होऊ शकाल? तेव्हा त्यात वेळ वाया घालवू नये हे यातून समजते. या राज्याने तर ९ वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमात मोदी व वसुंधरा राजे सरकारच्या योजनांच्या माहितीचाही समावेश केला आहे. यातून या मुलांना स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, मुख्यमंत्री जलस्वावलंबन योजना अशा विषयांच्या अभ्यासाची संधी मिळते. यातूनच पुढे या मुलांतून सुशिक्षित मतदार घडणार आहेत. राजस्थानप्रमाणेच दिल्लीतील सीबीएसई बोर्डाने महिलांच्या आरोग्यासंबंधी दिलेल्या माहितीचा समावेशही या पुस्तकांत करावा अशीही मागणी काही पुरुष पालकांनी केली आहे. या पाठय़पुस्तकात ३६-२४-३६ असे माप असणारी स्त्री आरोग्यवान असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी राजस्थानातील हिंदूीच्या पाठय़पुस्तकात गाढव हे कसे गृहिणींसारखे असते. त्यांच्याप्रमाणे ते सर्व कामे करते, परंतु ते त्यांच्यासारखे विश्वासघातकी नसते, असा गर्दभगौरव केला होता. एका पालकाने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगढ या रमणसिंहांच्या राज्यातही महिलांमुळे बेरोजगारीचे प्रमाण कसे वाढते अशी समाजशास्त्रीय माहिती देण्यात आली होती. यातून स्त्री-पुरुषांची कामाची वाटणी कशी असावी याचेच पाठ मिळत असून, ते चांगल्या समाजनिर्मितीसाठी फार आवश्यक आहेत. अन्य राज्य सरकारांना हे समजत नसेल, तर त्यांच्याविरोधात आम्हांस उग्र आंदोलन पुकारावे लागेल असा इशारा अखेरीस या पालकांनी दिला. या संदर्भात देशातील शिक्षणतज्ज्ञ तसेच मोदी सरकार कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.