हा शुद्ध अन्याय आहे. असला अन्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये व्हावा? गुजरातचे भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे चिरंजीव जैमीन यांच्याबाबतीत व्हावा? तोही गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर? हे फारच झाले. हे जे झाले ते ठाऊक असेल कदाचित सगळ्यांना. सोमवारच्या पहाटमुहूर्ताला चिरंजीव जैमीन हे त्यांच्या कुटुंबासह ग्रीसच्या दौऱ्यावर जाणार होते मे महिन्यातील विरंगुळ्यासाठी. पहाटे चार वाजता अहमदाबाद विमानतळावरून त्यांचे कतार एअरलाइन्सचे विमान उड्डाण करणार होते. मात्र कतार एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी जैमीन यांना रोखले. विमानात बसूच दिले नाही त्यांना. का? तर म्हणे, जैमीन यांनी अपेयपान केले होते. त्या अपेयपानामुळे त्यांना आपण काय करतोय, काय बोलतोय याची धड शुद्धही नव्हती. त्यांनी आधीच्या तांत्रिक बाबींची औपचारिकताही धड उभे राहता येत नसल्याने व्हीलचेअरवर बसून पूर्ण केल्या म्हणे. कतार एअरलाइन्सच्या या पवित्र्याने पटेल कुटुंब मग घरीच परतले. आता ही झाली ऐकीव माहिती. त्याआधारे प्रसारमाध्यमांनी बातम्याही देऊन टाकल्या नेहमीप्रमाणे. सत्य काय आहे, हे जाणून घेण्याची गरजही वाटली नाही कुणाला. जैमीन पटेल यांच्यावरचा हा घोर अन्यायच आहे. काही साध्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या बातमी देताना. मुळात गुजरातमध्ये कित्येक वर्षांपासून दारूबंदी आहे. तिथे दारू मिळतच नाही, अगदी मोदीकाळापासूनच. आणि विमानाची वेळ कितीची होती? पहाटे चारची. इतक्या पहाटे कुणी अपेयपान करतो का? ही वेळ मुखमार्जन करून, शुचिर्भूत होऊन मध टाकलेले गाईचे दूध पिण्याची, ही वेळ रामदेवबाबांनी शिकवलेली योगासने करण्याची, ही वेळ ध्यानधारणा करण्याची, नरसी मेहतांची भजने म्हणण्याची. अशा या पहाटवेळेला कुणी – आणि तेही गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव – असल्या वाटेला जातील, हे निव्वळ अशक्य. आता यात खरे काय झाले ते नितीन पटेल यांनी नंतर स्पष्ट केलेच. जैमीन यांची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे व्हीलचेअरवर बसूनच त्यांनी सगळ्या औपचारिकतांची पूर्तता केली. प्रकृती चांगली नसतानाही ग्रीसला सुट्टीसाठी निघालेल्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडू नये, म्हणून कोण धडपड चालली होती त्यांची. त्यातूनच त्यांच्यातील एका त्यागमूर्ती, कुटुंबवत्सल माणसाचे लख्ख दर्शन घडते. मात्र नंतर प्रकृती अधिक बिघडत असल्याचे लक्षात आल्याने ते व त्यांचे कुटुंब ग्रीसला न जाता सरळ घरीच परतले. इतकी साधीसरळ गोष्ट आहे ही. यावर विरोधकांनी कसलीही शहानिशा न करता बभ्रा केला तो जैमीन यांच्या अपेयपानाचा. खुद्द उपमुख्यमंत्री सांगताहेत की अपेयपान केलेच नव्हते, त्यावर विश्वास नको? सत्शील, सद्वर्तनी जैमीन यांना जबरदस्तीने अन्यायाचा हा एकच प्याला पचवावा लागला आहे. याची दखल घेऊन त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन व्हायलाच हवे. अन्यथा सद्वर्तनावरचा लोकांचा विश्वासच उडायचा.