तसे पाहिले, तर हा काही फार गंभीरच प्रकार नव्हे, पण केवळ विनोद म्हणून हसण्यावारी नेण्याचाही विषय नाही. पाळीव प्राणी माणसाळतात, ज्या कुटुंबासोबत ते राहतात, त्या कुटुंबातील माणसांचे गुणावगुण उचलून तेही त्याप्रमाणे वागतात आणि त्यांच्या स्वभावाची जडणघडणही त्यानुसार होत जाते, हे काही गुपित राहिलेले नाही. पण प्राण्यांना किती माणसाळू द्यावे, याचा विचार कधी ना कधी करावा लागणार आहे. पाळीव प्राण्यांना माणसासारखे बोलता येत नसले, तरी माणसांची भाषा, भाव आणि स्वभाव तंतोतंत समजतात. काही प्राणी माणसाचे अनुकरणदेखील करतात. आजकाल माणूसच आपल्या सवयींचे चांगलेवाईटपणाच्या तागडीत विभाजन करणे विसरून गेलेला असल्याने मालकाच्या साऱ्या सवयी चांगल्याच असे त्या माणसाळलेल्या पाळीव प्राण्यास वाटू लागले असेल तर त्यात आश्चर्य काहीच नाही. माणसाच्याच नव्हे, तर साऱ्या सजीवांच्या जगात, येणारा प्रत्येक क्षण हा केवळ पोट या अवयवाच्या विचाराभोवती केंद्रित असतो, यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. श्वास सुरू असेपर्यंतचा प्रत्येक क्षण केवळ पोटाच्या विचारानेच भारलेला असतो. कारण पोट भरणे हाच जगण्याचा उद्देश जसा वन्य प्राण्यांमध्ये आढळतो, तसा माणसांमध्येही आढळू लागल्यापासून माणसाळलेल्या पाळीव प्राण्यांनाही तशीच सवय लागली आहे. पोट भरण्याचे अनेक प्रकार माणसांच्या जगात दिसतात. काही जण उपासमारीने खंगल्यानंतर जगण्यापुरते काही पोटात ढकलण्यासाठी धडपडत असतात, तर काही जण पोटाची भूक पुरेपूर भागविण्यासाठी धडपडत असतात. काही जण भरल्यापोटी काहीतरी खात असतात, तर काहींच्या पोटाला खाण्याचे व्यसनच असते. पोट कधीच रिकामे राहू नये, यासाठी त्यांची धडपड सुरू असते. अशा परिस्थितीत, खाण्याच्या निवडीला प्राधान्य राहात नाही, असे जेव्हा होऊ लागले, तेव्हा पैसा ही खाण्याची गोष्ट असल्याची समजूत रूढ झाली आणि भरल्यापोटीदेखील पैसा पचविताही येतो, हे माणसांच्या त्या वर्गाला समजून चुकले. पैशाची चवदेखील अवीट असते, असेही सिद्ध झाले आणि पैसे खाणे हा प्रकार माणसांच्या त्या वर्गाने मनापासून आवडीने स्वीकारला. मग माणसाळलेल्या पाळीव प्राण्यांनादेखील या सवयीचे वारे लागले असतील, तर त्यात धक्कादायक वाटावे असे काहीच नाही. उत्तर प्रदेशातील तालग्राम भागातील एका शेतकऱ्याने पाळीव शेळीला वेळेवर चारा न दिल्याने त्या शेळीने शेतकऱ्याच्या खिशातील नोटांवर डल्ला मारला आणि तब्बल ६२ हजारांच्या नोटा फस्त केल्या अशी बातमी माध्यमांतून फिरू लागल्यावर काहींना आश्चर्य वाटले, काहींना धक्का बसला. पण बातमीचे एक वैशिष्टय़च असते. माणूस पैसे खातो, ही आता बातमी राहिलेली नाही. म्हणूनच शेळीने पैसे खाल्ले या घटनेला बातमीमूल्य आले. पाळीव प्राण्यांकडून असे काही घडलेच, तर यापुढे आश्चर्य वाटून घेऊ नये. तो माणसाळलेपणाचाच परिणाम समजावा, आणि सोडून द्यावे..