‘आता लवकरच वाईट दिवस संपतील, आणि सगळीकडे अच्छे दिन येतील’ या आशेवरच आपण अलीकडच्या काही वर्षांपासून दररोज उगवणाऱ्या नव्या दिवसाकडे डोळे लावून रात्री झोपी जातो, आणि सुखाच्या, आनंदाच्या स्वप्नांची मिटल्या डोळ्यांवर पखरण करीत नव्या दिवसाच्या दिशेने रात्र पुढे सरकते. सकाळी जाग येते, आणि आपल्या प्रतीक्षेतील तो नवा दिवस सुरू होतो. पण फारसा फरक जाणवतच नाही. आसपास तोच, नेहमीच्याच कावळ्यांचा कर्कश कलकलाट सुरू असतो, घराच्या वळचणीला जंगली कबुतरांची किळसवाणी वळवळ सुरू असते, आणि सारे काही तेच तेच दिसत असते. उलट, गेल्याच आठवडय़ात येऊन गेलेला तोच वार पुन्हा उगवलेला असतो. कॅलेंडरावरच्या तारखेचा बदललेला चौकोन सोडला, तर नवा दिवसही कालपरवासारखाच असतो. तरीही आपण आशा सोडत नसतो. आपण पुन्हा नव्या उद्याकडे डोळे लावतो. उद्याचा दिवस नक्कीच आनंदाचा एखादा तरी अनोखा क्षण आपल्या झोळीत टाकेल या आशेने आलेला दिवस मागे ढकलून टाकतो. हे सारे इतके सवयीचे झालेले असते, की या नव्या, आनंदी दिवसाच्या आशेच्या डोहात आपण कधीपासून गटांगळ्या खातोय हेही आता आपल्याला आठवेनासे झालेले असते. या डोहावर एखाद्या क्षणी अलगद आनंदाचे तरंग उमटावेत असे कधीपासून वाटत असले, तरी आता त्या प्रतीक्षेचा आनंदही आपल्यापासून लांब लांब चालला आहे. आपल्या अंगणात डोह असला, तरी त्या आनंदाचे तरंग मात्र, डोहाच्या किनाऱ्यावरच्या आपल्या शेजाऱ्याच्या समाधानाचे निमित्त होत आहेत. आपण मात्र आनंदाच्या त्या क्षणापासून दुरावलेलेच राहिलो आहोत. कदाचित, जे आहे त्यातच आनंद मानावा, या आपल्या सांस्कृतिक सवयीचाही तो परिणाम असावा. पण आनंदाचे ते माप कधी आपल्या वाटय़ाला भरभरून आलेलेच नाही. आता तर, ते मापटे आणखीनच अधुरे वाटू लागले आहे. जागतिक पातळीवरच्या आनंदाच्या स्तराच्या एका पाहणीत भारताची क्रमवारी आणखीनच घसरली आहे, आणि चीन, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका या देशांच्या आनंदाचा स्तरदेखील आपल्याहून अधिक आहे. अगोदरच आपल्याकडे आनंदाची वानवा, आणि त्यातही चीन पाकिस्तानसारखे शेजारी शत्रू आपल्यापेक्षा आनंदी.. अशा स्थितीत, जे आहे त्यात तरी आनंद कसा वाटेल?.. देशात आनंदाच्या दिवसांच्या केवळ स्वप्नांची पखरण सुरू झाली, तेव्हा असहिष्णुतेचा वणवा पेटला. भविष्याच्या भयाने सहिष्णु मनांचा थरकाप झाला, आणि भयाचे तरंग देशभर उमटले. त्या वेळीही, आनंदाच्या अपेक्षेने जगणाऱ्या अनेक मनांवर ओरखडेच उमटले होते. ‘इथे राहणे नको वाटत असेल, तर पाकिस्तानात जा’ असा इशारा देणारे बेमुर्वत सूर शिरजोर झाले. आता त्यांचादेखील आनंद हिरमुसला झाला असेल. कारण पाकिस्तान आपल्यापेक्षा अधिक आनंदी आहे.. त्या पाहणी अहवालानेच असा निर्वाळा दिल्यावर सल्ला देणारे तरी कसे बरे आनंदी राहणार? आनंद तर हरवतोच आहे!!