सकाळी चहा व सोबत मारीची दोन बिस्किटे खाऊन झाल्यानंतर दिनकरपंतांनी व्हॉट्सअ‍ॅप सुरू केले. आदल्या रात्री नेहमीप्रमाणे सकाळचा पावणेसहाचा गजर लावून ते झोपी गेले होते. ‘बी इंडियन.. बाय इंडियन’ या त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहावरील चर्चा रात्री बराच काळ चालू होती, असे त्यांच्या ध्यानी आले. ती चर्चा वाचत असताना घरातील कुणाचा तरी भ्रमणध्वनी ‘चीन्मया सकल हृदया..’ अशी साद मालकाला घालू लागला. ती ऐकताक्षणी पंतांच्या अंगात अचानक काही तरी संचारल्यागत झाले. आपल्या डोक्यावर  कुणी तरी पुणेरी पगडी घातली आहे.. आपल्या नाकाखाली झुबकेदार मिशा उगवल्या आहेत.. आपण दुटांगी धोतर व सदरा अशा कपडय़ांत आहोत, असा भास त्यांना झाला. व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेश वाचता वाचता, ‘तुमचे डोके ठिकाणावर आहे काय?’ अशी गर्जना त्यांनी त्यांना झेपेल एवढय़ा आवाजात केली. रोज सकाळी दाराला लावलेली वर्तमानपत्रे काढून घेण्यासाठी नेमक्या त्याच वेळी हॉलमध्ये आलेल्या सौ. दिनकरपंत यांनी दिनकरपंतांकडे एक कटाक्ष टाकला. ‘आज तरी संध्याकाळी येताना दिव्याच्या माळा आणा’, असे सांगून त्या आतमध्ये जाऊ लागल्या. त्यासरशी दिनकरपंतांनी, ‘आणेन पण त्या नेहमीच्या दुकानातून, मिचमिच्या डोळ्यांच्या उजेडाच्या आणणार नाही.. ग्राहकरक्षायज्ञ भांडारातून सणसणीत उजेडाच्या आणेन,’ असे बाणेदार उद्गार काढले. त्यावर, ‘मग ३५ रुपये जादा घेऊन जा,’ असे म्हणत सौ. दिनकरपंत आतल्या खोलीत निघून गेल्या. इतक्यात ‘चीन्मया सकल हृदया..’ची साद पुन्हा दिनकरपंतांच्या कानावर पडू लागली. दिनकरपंतांची सून लगबगीने आली. तिने भ्रमणध्वनी कानांस लावला. ‘हो हो.. संध्याकाळी जाऊ या मार्केटात. रिटर्न गिफ्ट द्यायची आहेत ना. हो हो नेहमीच्याच दुकानातून घेऊ या..’ असे सांगून तिने संभाषणाला पूर्णविराम दिला. ‘नाही.. मुळीच नाही. नेहमीच्या दुकानातून नाही. ग्राहकरक्षायज्ञ भांडारातून आणा, जे काही आणायचे ते’.. त्यांनी सुनेस बजावले. ‘छे हो.. उगाच खर्च कशाला वाढवायचा,’ इतकेच म्हणून सून तेथून निघून गेली. ‘या लोकांना काही कळतच नाही. क्षुल्लक स्वार्थापुढे मोठा विचार दिसतच नाही यांना,’ असा विचार अस्वस्थ दिनकरपंतांच्या मनात डोकावला. तेवढय़ात दिनकरपंतांचा पुत्र हॉलमध्ये आला व त्याने टेलिव्हिजन सुरू केला. एका वृत्तवाहिनीवर दोन माणसे कसल्या तरी कागदपत्रांवर स्वाक्षरी करीत असल्याचे दृश्य सुरू होते. तळाशी ‘ताजी बातमी’ असे सांगत एक वृत्तपट्टी सरकत होती. ‘दोन देशांमधील ऐतिहासिक भिंतीवर उभय देशांच्या नेत्यांची ऐतिहासिक भेट. २३ अब्ज डॉलरचे करार. दोन देशांमधील अर्थबंध अधिक दृढ होणार..’ दिनकरपंत डोळे विस्फारून ती पट्टी बघत राहिले. आपल्या डोक्यावरील पगडी उतरली आहे, असा भास त्यांना झाला. ते अस्वस्थ झाले. घाबरून त्यांनी नाकाखाली हात फिरवला. तेथील झुबकेदार मिशीही नाहीशी झाली होती.