राजकारण आणि काव्य यांचे फारसे सख्य नसते असे म्हणतात. पण महाराष्ट्राच्या विधानसभेत मात्र, गेल्या काही दिवसांपासून काव्यसृष्टीला जो काही बहर आलेला दिसत आहे, त्यावरून तर, राजकारण हा एक हिरवागार बगीचा आहे, आणि जागोजागी काव्यफुलांचे ताटवे फुलले आहेत, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी विरोधकांतील आणि सत्ताधाऱ्यांतील विरोधी सदस्य कामकाजात सहभागी न होता आंदोलने करत असल्याने त्यांच्याकडे वेळच वेळ आहे. एरवीही, काव्य स्फुरण्यासाठी मनाला थोडा निवांतपणा हवाच असतो. पायरीवर बसल्याबसल्या किंवा अध्यक्षांच्या आसनासमोरच्या मोकळ्या जागेत टाळ कुटताना तयार होणारा ताल तर कवित्वासाठी अधिकच पोषक वातावरण तयार करत असतो. तसे नसते, तर विधान परिषदेत अर्थसंकल्पासारख्या क्लिष्ट विषयाला काव्य आणि संगीताची साथ मिळती ना! आता असे अजोड काव्य स्फुरण्यासाठी परिस्थितीही तशीच पाहिजे. पण मराठी माणसाला कोणत्याही स्थितीत काव्य सुचते असे म्हणतात. शिवसेनेचा वाघ ही काही अर्थसंकल्प वाचनाच्या पाश्र्वभूमीवर कविता सुचण्यासारखी कल्पना नाही. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्दय़ावर विरोधकांपेक्षा मोठय़ा आवाजात गुरगुरणाऱ्या शिवसेनेने अखेर ऐनवेळी माघार घेऊन सरकारच्या सुराशी जुळवून घेतले, आणि या वाघाच्या वागणुकीवर कविता सुरू झाल्या. विधान परिषद हे तसेही विद्वानांचे, अभ्यासकांचे आणि ज्येष्ठांचेच सभागृह असते. तेथील जाणकारांमध्ये कलावंत असतात आणि  कवीही असतात. अशी या सभागृहाची परंपरा. त्याच परंपरेचे पाईक होत शनिवारी सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेवर रिंगण करून कलागुणांचा आविष्कार सादर केला आणि कुणा सदस्याच्या कविमनात सेनेच्या वाघाच्या स्थितीवरील काव्यपंक्ती उमटू लागल्या. कवितेच्या प्रसवण्याची एक प्रक्रिया असते. अगोदर शब्द मनात फेर धरू लागतात, मग ते ओथंबून बाहेर ओसंडू लागतात. तसेच काहीसे वाघावरील काव्यपंक्तींचेही झाले असावे. मोठय़ा आवेशात गुरकावत दिल्लीत गेलेले वाघाचे ते बछडे परत आल्यानंतर मात्र शांत झालेले पाहून विरोधकांना वाघाचा राग येणे साहजिकच होते. ज्यांच्या भरवशावर आंदोलनाला बळ मिळाल्याच्या खुशीचे वारे वाहू लागले, त्यांनीच दाखवायचे दातही आत घेतल्याने अचानक अशी पोकळी निर्माण झाली तर कसे चालणार? त्या अस्वस्थतेलाच शब्दरूप आले आणि ते ओठांतून ओसंडू लागले. ‘वाघ दिल्लीत गेला, म्यावम्याव करत परत आला’ ही पहिली काव्यपंक्ती तर यमक आणि रूपकाच्या अलंकारांनी पुरेपूर सजल्याचे लक्षात आल्यावर सभागृहातील रिंगणाला ताल गवसला, कवितेच्या ओळीला चालही सापडली.  तसेही, महाराष्ट्राच्या राजकारणाची एक परंपरा आहे. गल्लीत गुरकावणारे सारे दिल्लीत मात्र म्याव करतात, हा इतिहास नवा नाही. ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ म्हणतात, ते यालाच!