नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, आणि अमित शहा हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत हे नशीबच म्हणायचे. अन्यथा आपल्या देशाचे काही खरे नव्हते. आधीच्या साठ वर्षांत देशातील सगळ्यांनाच केवळ बडबड करण्याची व्याधी जडली होती. मोदी-शहा या दुकलीने तीन वर्षांपूर्वी घडवलेल्या क्रांतीनंतर ही व्याधी हळूहळू दूर होत आहे; पण तरीही अधूनमधून ती उफाळून येतेच. परवाचेच उदाहरण घ्या. अमित शहा यांनी, ‘गांधीजी म्हणजे चतुर बनिया होते’, असे अभ्यासपूर्ण विधान केले आणि झाले, एकच टीका सुरू झाली. वर उल्लेख केलेली व अधूनमधून जनतेत उफाळून येणारी व्याधी हीच ती. अमित शहा हे गांधीजींचे अभ्यासक आहेत. ते त्यांना प्रातस्मरणीय आहेत. ते गांधीजींचा अवमान चुकूनही करणार नाहीत. ‘गांधीजी हे चतुर बनिया होते’, या शहा यांच्या वक्तव्यात काहीही चूक नाही. गांधीजी होतेच चतुर बनिया. काय केले म्हणजे काय मिळते याचा पक्का हिशेब असायचा त्यांच्या डोक्यात. म्हणजे उदाहरणार्थ, दांडी मोर्चासारखा एखादा मोर्चा काढला की अनेकांना रोजगार मिळतो, हे त्यांना ठाऊक होते. झपाझप चालले म्हणजे तब्येत चांगली राहते आणि कुठलेही आजारपण जवळ येत नाही. त्यामुळे मग औषधांवर खर्च होत नाही, हे माहिती होते त्यांना. म्हणून तर ते तसे चालायचे. दुधासाठी बकरी पाळली की मग दुधासाठीचा खर्चही करायला नको. बकरी काय कुठेही थोडेसे गवत खाऊन गुजराण करेल, याच हेतूने त्यांनी बकरी पाळली होती, हे ठाऊक नाही अनेकांना. त्यांनी अनेकदा केलेली उपोषणे म्हणजे तर बनियागिरीचे उत्तम उदाहरण. या उपोषणांमुळे घरचा जेवणाखाण्याचा केवढा तरी खर्च वाचवला त्यांनी. कस्तुरबांनाही त्यातील चलाखी माहिती नव्हती. हे तर जाऊच दे.. त्यांची अहिंसा म्हणजेदेखील त्यांच्यातील चतुर बनियाचेच उदाहरण. इंग्रज लोक लाठय़ा चालवून चालवून, बंदुकीतून गोळ्या झाडून झाडून कंटाळतील आणि जातील निघून या देशातून हे पक्के ठाऊक होते त्यांना. म्हणून तर ज्यासाठी खिशातील एक दमडीही खर्च होत नाही अशी अहिंसा त्यांनी जवळ केली. गेले की नाही इंग्रज शेवटी कंटाळून? काही भाबडय़ा लोकांनी त्या अहिंसेस उगाच तात्त्विक वगैरे मुलामे दिले. फक्त एकच हिशेब चुकला त्यांचा. ३१ जानेवारी १९४८ रोजी एका माणसाने त्यांना प्रणाम केला आणि प्रणाम करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा गोळ्यांचा हिशेब अंमळ चुकला गांधीजींचा. पण ठीक आहे. आयुष्यभर ज्या बनियाचे हिशेब कधी चुकले नाहीत, त्यांना असा एखादा चुकलेला हिशेब माफ करायला हवा सगळ्यांनी मोठय़ा मनाने. गांधीजींना या चुकलेल्या हिशेबासाठी माफ करताना अमित शहा परवा जे काही म्हणाले त्यास अनुमोदन द्यायला हवे सगळ्यांनी. कुणीही, काहीही म्हणो.. गांधीजी म्हणजे चतुर बनियाच एक..