राजकारण हा आपला प्रांत नाही हे माजी पंतप्रधान मा. मनमोहन सिंग यांना अजूनही समजू नये याचे समस्त देशवासीयांस आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नसेल. आमच्या माहितीनुसार मनमोहन सिंग हे नामवंत अर्थतज्ज्ञ असले तरी त्यांचा पैशाशी तसा काही संबंध नाही. ते भलेही रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर राहिले असतील, परंतु त्यांच्या व्यवहारज्ञानाबद्दल अंमळ शंकाच आहे. जो मनुष्य पंतप्रधानकी गेल्यानंतर तातडीने सरकारी बंगला खाली करतो, त्यास राजकीय व्यवहार समजतो हे कसे म्हणावे? आता पंतप्रधान असताना त्यांच्यावर का कमी आरोप झाले? टीका तर महामूर झाली. खिल्ली तर प्रचंडच उडवली गेली. अशा वेळी राजकीय व्यक्ती काय करते? तर- १. आरोप करणारे कसे वाईट आहेत हे सांगते. २. आरोप करणाऱ्यांवर प्रतिआरोप करते. ३. आरोप करणाऱ्यांवर आपल्या अनुयायांची माध्यमी फौज सोडते. ४. आरोप करणाऱ्यांवर न्यायालयात बदनामीचा दावा लावण्याची धमकी देते. ५. असेच बरेच काही करते; पण यांस ते सुचलेच नाही. वसावसा बोलणे हे त्यांस कधी जमलेच नाही. ते आपले ब्रिटिश संसदीय परंपरांचे पालन करीत बसले. ब्रिटिश गेले नि तो संसदीय उदारमतवादही गेला, हे समजलेच नाही बहुधा त्यांना. काही दिवसांपूर्वी त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी की नोटाबदली की काळेधनविरोधी मोहीम की अर्थव्यवस्थेचे कॅशलेसीकरण यापैकी कोणत्या तरी एका की सगळ्याच धोरणावर टीका केली. साधा आवाजही न चढवता केलेली ती टीका. तिला काय अर्थ असणार? मोदी सरकारचे व मोदी अनुयायांचे मोठेपण हे की, त्यांनी ही टीका गांभीर्याने घेतली व मनमोहन सिंग यांच्यावर उलटे आरोप केले, टीका केली, खिल्ली उडवली. आता त्यावर तरी त्यांनी काही बोलावे. सरकारला, रिझव्‍‌र्ह बँकेला धारेवर धरावे, तर नाही! उलट या सद्गृहस्थाने काय केले? तर संसदीय समितीच्या बैठकीत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यावर टीका करणाऱ्यांना गप्प केले. उत्तम राजकारणी पुरुषाने काय केले असते? तर घेताहेत उलटेपालटे तर घेऊ द्यात, असे म्हणत मौज लुटली असती; परंतु यांना राजकीय उदारमतवाद प्रिय. ते पटेलांच्या बचावार्थ धावले. आता त्यांचा आवाज तो काय? दुबळा! त्यात ना ती दहाड, ना तो खर्ज! त्यास किती वजन असणार? पण तरीही रिझव्‍‌र्ह बँकेची मर्यादा राखण्यासाठी त्यांनी तो पणाला लावला. त्यांस सद्य:कालीन राजकारणाची कणमात्र माहिती नाही हेच यातून दिसले. सद्य:कालात विरोधकांसही सन्मानाने वागविणे, दुसरीही बाजू असते हे मान्य करून ती समजून घेणे यास दुबळेपणा म्हणतात. तोच मनमोहन सिंग यांनी दाखविला. राजकारण हा त्यांचा प्रांत नसून ते सांप्रती ‘मिसफिट’ आहेत, हे आता त्यांस खरोखरच सांगावे लागेल..