जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन प्रवेशाची उस्तवार करायची म्हणजे साधी का गोष्ट आहे? स्वरचित विनोद व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याइतके किंवा पररचित विनोद पुढे सरकवून देण्याइतके का ते सोपे आहे? आणि शेवटी सव्‍‌र्हरनामक यंत्राच्या ताकदीला काही मर्यादा असणारच ना. यंत्राने २४ तास उत्तमच चालावे, अशी अपेक्षा तत्त्वत: करणे मान्य, पण शेवटी त्याच्याही सरसकटीकरणाला काही अंगभूत वेसण असणारच ना. म्हणून तर काल या यंत्राला एक दिवसाचा आराम देण्यात आला. दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणाढय़ांच्या प्रवेशास त्यामुळे एक दिवस विलंब झाला; पण तो – म्हणजे आराम – आवश्यकच होता. मान्य की प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यापासूनच त्यात काही अडथळे येत होते. जसे की सकाळी उत्साहात सुरू असलेला सव्‍‌र्हर दुपारनंतर बंद पडणे, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना विषयांच्या रकान्यांत मिळवलेल्या गुणांपेक्षा अधिक गुण दिसणे, मुख्याध्यापकांना लॉगइनच न करता येणे, कला-क्रीडा या कोटय़ातील गुणांची बेरीजच न दाखवणे आदी. पण हे इतके अडथळे का आले त्याचा विचार नको करायला? एक तर विद्यार्थ्यांची संख्या इतकी भलीमोठी. लाखांतले हिशेब. त्यात त्यांचे गुणही भरभक्कम. ९०-९२ टक्के म्हणजे किरकोळ वाटावेत, अशी स्थिती आणि एक-दोन नव्हे, तब्बल १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के व अधिक मिळालेले. ही अशी इतकी माहिती मिळाल्याने ताण येणारच सव्‍‌र्हरच्या मेंदूवर. १०० टक्के मिळाल्याचे ऐकून आपला मेंदू नाही गरगरत? तसेच त्या सव्‍‌र्हरचेही झाले असणार. यंत्रालाही भावना असतात, हे ठाऊक नाही का? त्या गुणांचा विचार करून आणि एकंदर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करकरून दमला असणार बिचारा सव्‍‌र्हर. अशा दमलेल्या सव्‍‌र्हरला विश्रांती द्यायला हवीच होती थोडीशी; पण लोक तरी काय एक एक उठवतात. काल होता योग दिवस. या दिवशी सव्‍‌र्हर शवासन करीत आहे, अशी सबब सहज सांगण्याजोगी आणि त्या नावाखाली प्रवेशप्रक्रिया बंद ठेवली की विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही योगासने करण्यासाठी वेळ मिळेल; मुख्य म्हणजे या खात्याचे मंत्री, या कामाशी संबंधित मंडळी या सगळ्यांनाही निवांतपणे योगासने करता येतील, असे उठवून दिले कुणी तरी. काय तरी विनोद सुचतात अशा वेळी कुणाला; पण त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे. मुद्दा असा की, काल एक दिवस प्रवेशप्रक्रिया थांबवावी लागली असली तरी लगेच, ‘ही ऑनलाइन प्रवेश पद्धतीच अनुत्तीर्ण झाली’, असे बोल त्यास लावू नयेत. शिवाय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांलाही लगेच फेरपरीक्षा देण्याची सोय आपल्याकडे आहे. तसेच या पद्धतीचेही. झाली असेल अनुत्तीर्ण या वेळी, पण पुढच्या वेळी होईल की ती उत्तीर्ण. माणसाने नेहमी आशावादी राहावे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे कायम लक्षात ठेवावे.  तेवढा दमलेला सव्‍‌र्हर आज चालू झालाय का नीट ते बघायला हवे..