आणखी काही वर्षांनी देशातील नागरिकांच्या ‘राष्ट्रभक्ती’च्या भावनिक स्तराची चाचणी घेतली, तर मध्य प्रदेश हे राज्य सर्वात अग्रेसर राहील, यात शंका नाही. ‘राष्ट्रभक्त हा घडवावा लागतो, तो जन्माला येत नसतो’ या विधानावर मध्य प्रदेश सरकारची अंतिम श्रद्धा असल्याने येथे आता राष्ट्रभक्त घडविण्याचे नवे प्रयोग सुरू झाले आहेत. आपण या प्रयोगाला ‘मध्य’ममार्ग असेही म्हणू शकतो. कारण राष्ट्रभक्तीचे नेमके निकष कोणते यावर मध्यंतरीच्या काळात अनेक चर्चा घडल्या, वादविवादही झडले, तरीही अजूनही आपल्याला ‘सच्चा राष्ट्रभक्त’ कोणास म्हणावयाचे याचे उत्तर सापडलेले नाही. ‘वंदे मातरम’ म्हणणारास सच्चा राष्ट्रभक्त मानावे, तर, तुरुंगाची हवा खाणाऱ्या अनेक नव-संत आणि नेत्यांनी आपल्या भरभराटीच्या काळात हात उंचावून आशीर्वादाच्या थाटात अनेकदा वंदे मातरमचा उद्घोष केलेला असतो. चिनी मालावर बहिष्कार घालण्याची आवाहने करीत अहोरात्र समाजमाध्यमांवर बोटे चालविणाऱ्यास राष्ट्रभक्त म्हणावे तर त्याच्या हाती असलेला मोबाइलच चिनी बनावटीचा निघतो. शिवाय वंदे मातरम हाच राष्ट्रभक्तीचा निकष ठरविला तर समाजातील अनेक घटकांच्या भावना दुखावून त्याचा परिणाम निवडणुकीतील मतांच्या गणितावर होण्याची भीती असल्याने, राष्ट्रभक्तीचा तो निकष सोयीचा ठरत नाही हे लक्षात येऊ लागताच, अन्य निकषांचा गांभीर्याने विचार सुरू झाला. या वादात, ‘जय हिंद’चा उद्घोष हे राष्ट्रभक्तीचे अस्सल व वादातीत ‘मध्यममार्गी’ प्रतीक ठरू शकते असा तोडगा बहुधा मध्य प्रदेश सरकारला सापडला असावा. आता या चार अक्षरी मंत्राचा जप करून भावी पिढीमध्ये राष्ट्रभक्ती रुजविण्याचा वसा मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. शाळेची घंटा वाजली की पहिल्याच तासाला वर्गात येणाऱ्या शिक्षकांचे स्वागतच ‘जय हिंद’ या घोषणेने झाले, तर शिक्षकवर्गाच्याही अंगावर राष्ट्रभक्तीचे रोमांच उभे राहतील यात शंका नाही. अशा राष्ट्रभक्तीमय वातावरणाने भारलेल्या परिसरात वावरणाऱ्या प्रत्येकाच्या नसानसात कालांतराने राष्ट्रभक्तीचे अंगार भिनू लागतील. अस्सल राष्ट्रभक्तांची भावी पिढी निर्माण करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने जय हिंद मंत्रयज्ञाचा घाट तर घातला आहे. ‘याची सक्ती नाही’ असे मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री कुंवर विजय शाह यांनी म्हटले असले, तरी मध्यममार्ग आणखी मवाळ करण्याचा तो एक राजकीय पवित्रा आहे, हे कुणीही ओळखू शकेल. एवढय़ा प्रभावी प्रयोगाने भारावल्यानंतर, सक्ती नसतानाही कुणाच्याही तोंडून जय हिंदचा मंत्रघोष होणार, तो नसानसात घुमणार आणि या मंत्राचा जप करणारा तो प्रत्येक जण भावी काळात प्रखर राष्ट्रभक्त ठरणार, यात शंका नाही. या ‘प्रायोगिक’ राष्ट्रभक्तीचे लोण सतना जिल्ह्य़ातील मोजक्या शाळांमधून झपाटय़ाने राज्यभर पसरेल आणि मध्य प्रदेशाच्या नसानसात जय हिंद मंत्र भिनून प्रत्येक मध्य प्रदेशवासी सच्चा राष्ट्रभक्त ठरेल. आता अन्य राज्यांनी राष्ट्रभक्तनिर्मितीच्या या प्रयोगात मागे राहता कामा नये, हेच खरे!