डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्या समाजघटकाच्या उद्धारासाठी महात्मा गांधींनी देशात घडविलेल्या क्रांतीनंतर अशाच प्रकारच्या क्रांतीचे श्रेय जर बिंदेश्वर पाठक यांना द्यायचे झाले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीजी आणि बिंदेश्वर पाठक यांचे वारस ठरतात. बिंदेश्वर पाठक यांच्या सुलभ इंटरनॅशनलने देशाच्या स्वच्छताव्रताचा ठेका घेतला आणि देश-विदेशातील असंख्य संस्था, संघटना आणि सरकारांनीही त्यांना सन्मानित करण्यासाठी रांगा लावल्या. शेकडो पुरस्कार त्यांच्यासाठी वाट पाहू लागले. न्यू यॉर्कच्या महापौरांनी तर १४ एप्रिल २०१६ हा दिवसच बिंदेश्वर पाठक यांना अर्पण करून टाकला, आणि त्याच्या तब्बल १५ वर्षे अगोदर भारतात तत्कालीन सरकारने त्यांना पद्मविभूषण किताबाने गौरविले होते. थोडक्यात, बिंदेश्वर पाठक हे स्वच्छतेचे खरे ठेकेदार आणि मोदी हे त्यांचे वारस ठरतात. भारतभराच्या प्रवासात अनुभवलेल्या स्वच्छतेबाबतच्या उदासीनतेने उद्विग्न होऊन बिंदेश्वर पाठक यांनी सुलभच्या नावाने स्वच्छतेचा ठेका घेतला आणि बघता बघता सत्ताधीशांनी त्यांना आपल्या निकटवर्तीयांच्या प्रभावळीत समाविष्ट करून घेतले. गेल्या साडेचार दशकांत एकाही सरकारने बिंदेश्वर पाठक यांच्या गुणगानाची संधी वाया दवडली नाही, हे त्यांच्या ठेकेदारीच्या व्रताचे फळ म्हणावे लागेल. सरकार कोणतेही असले, तरी पाठक यांच्या पाठीशी ते उभे राहते, एवढे एकच उदाहरण या देशातील सरकारला स्वच्छतेविषयी आस्था आहे, याची साक्ष देण्यासाठीदेखील पुरेसे आहे. त्यात, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर लाल किल्ल्यावरील भाषणातून स्वच्छतेची महती देशाला समजावून सांगत स्वच्छ भारत मोहीम हाती घेतल्याने पाठकांच्या स्वच्छतेच्या सेवेच्या ठेकेदारीस मोदी सरकारचाही भरभरून पाठिंबा मिळणार हे तर स्पष्टच होते आणि तसेच झाले! सन्मानाच्या साऱ्या संधी अगोदरच पदरात पडलेल्या असल्याने पाठक यांना भारतीय रेल्वेचे स्वच्छतादूत म्हणून मानाचे नवे स्थान मिळाले आणि नव्या सरकारनेही पाठक यांच्याशी वैचारिक ऋणानुबंधाचे नाते जोडले, हेदेखील तेव्हाच स्पष्ट झाले. पंतप्रधान मोदी आणि बिंदेश्वर पाठक हे तर एकाच स्वप्नाचे, स्वच्छ भारताच्या स्वप्नाचे सौदागर! दोघांचीही मने याच ध्यासाने भारलेली.. एकाच विचाराने भारलेल्या मनांचे नाते जुळले, की माणसे अधिक जवळ येतात असे म्हणतात. समाजशास्त्राची डॉक्टरेट मिळविल्याने, मनामनाचा अभ्यास असलेल्या पाठक यांचे मोदी यांच्या मनाशी नाते जुळणे तर साहजिकच होते. त्यातूनच त्यांना मोदी अधिक जवळून पाहावयास आणि अनुभवास आले असावेत. बुधवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशित झालेले ‘द मेकिंग ऑफ लीजंड’ हे नरेंद्र मोदी यांच्यावरील पाठक यांचे पुस्तक तर, मोदी-पाठक नात्याची वीण किती घट्ट रुजली त्याचाच पुरावा असावा. सरकारी स्वच्छताव्रतावर पाठक यांची मोहोर उमटेल, तेव्हा हे व्रत खडतर राहणार नाही, तर अधिकच सुलभ होईल. तो दिवस दूर नाही हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही!