विद्यार्थ्यांनो, सर्व छान चाललेले असताना काही जण दररोज छोटी छोटी खुसपटे काढत राहतात. आज काय विकासच वेडा झाला, उद्या काय यंत्रणाच ताटाखालचं मांजर झाल्या.. परवा काय पुरवणीच नाही मिळाली.. वगैरे. विद्यार्थ्यांनो, यापैकी विकास आणि यंत्रणा हे राजकीय विषय आहेत. आणि तुम्ही आता पदवीचे किंवा त्याहीनंतरचे विद्यार्थी आहात. विद्यापीठ हे पवित्र मंदिर असल्यामुळे तिथे राजकारण नको, हे तुम्हाला माहीतच आहे. जर राजकारण नको हे मान्य आहे, तर पुरवणी नको हे ओघाने मान्य करायला कुणाची हरकत असायचे काही कारण आहे का? नुसती तिसऱ्यांदा मान डोलवायची आहे तुम्ही. आम्ही काय करतो हे तुम्ही विचारू नये. आम्ही काम करतो. तेही ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसारखे महाकठीण काम. तुम्हाला उत्तरपत्रिका लिहायला अडीच तास पुरतात, त्या तपासण्यासाठी आम्हाला अडीच महिनेसुद्धा कमीच पडतात. वर तुम्ही ४० पानी उत्तरपत्रिकांनाही पुरवण्या जोडता. मुद्दाम मोठमोठय़ा अक्षरात, एका ओळीत तीनचारच शब्द लिहून, एकेका उत्तरानंतर दोनदोन ओळींची जागा सोडून कागद वाया घालवता. संगणकाचा ‘स्कॅनिंग’चा वेळ वाढवून वीजही वाया घालवता. पर्यावरणाचा नाश करता. शिवाय तुमच्याचपैकी अनेकांच्या पुरवण्या हरवतात. गहाळ होतात. तो ठपका आमच्यावर ठेवायला तुम्ही तत्परच असता. कितींदा सांगावे तुम्हाला की राजकारण आणू नका. पण नाही. तेव्हा आता ऑनलाइन तपासणीच्या क्रांतीनंतरचा कठोर निर्णय घ्यावाच लागणार. आणि एकदा निर्णय घेतला की तो कसा अन् किती कार्यक्षमतेने अमलात आणला जातो याबाबतचा आमचा लौकिक एव्हाना तुम्हाला अनुभवास आला असेलच.. तर, यापुढे पुरवणी बंद. पुरवणी कुणी जोडलीच, तर तो ‘कागदाचा तुकडा’ समजला जाईल. हा निर्णय तुमच्या हितासाठीच आहे. तुम्ही देशाचे भवितव्य. देशाच्या भवितव्यासाठीच हा निर्णय. तेव्हा आता मुखावर आनंद दिसू द्या. लक्षात असू द्या : तुमचे मुख हेच देशमुख.