नेता कसा असावा? सर्वाभूती समन्यायी. धर्म-जातीवरून भेदभाव न करता रयतेची काळजी घेणारा. ही काळजी केवळ माणूस जिवंत असतानाची नव्हे, तर नंतरचीही. नंतरचीही म्हणजे माणसाचे डोळे मिटल्यानंतर, त्याने अखेरचा श्वास घेतल्यानंतर इहलोकातून परलोकी प्रस्थान करण्यासाठीचीही. त्याच्या या प्रस्थानात धर्माचा, जातीचा अडसर येऊ नये, हे पाहणारा. आपले आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेत्याच्या या अपेक्षित गुणसंगोपनाच्या, गुणवर्धनाच्या निकषांत अगदी यथायोग्य पद्धतीने बसतात. तसा, त्यांच्यातील या गुणांचा परिचय समस्त जगाला ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच झाला होता. गुजरातमध्ये शांतता नांदावी, यासाठी त्यांनी तेव्हा तीन दिवसांचे उपोषण केले होते. त्या वेळी विविध धर्मीय मंडळींनी त्यांची भेट घेऊन सद्भावना व्यक्त केली होती. मोदी यांच्या या गुणांची पुन्हा आठवण येण्याचे कारण म्हणजे त्यांनी उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे केलेले वक्तव्य. मोदी म्हणाले की, ‘रमझानच्या काळात लोकांना अखंड वीज मिळणार असेल, तर ती दिवाळीतही मिळायला हवी.. आणि एखाद्या गावात जर मुस्लिमांसाठी कब्रस्तान बांधले जाणार असेल तर हिंदूंसाठी स्मशानही उभारायला हवे.’ इतके सरळसाधे विधान. तरीही हिंदू-मुस्लीम यांच्यातील द्वैत मिटवून अद्वैत साधणारे आणि ‘सरणापाशी समान सारे’ असा तात्त्विक संदेश देणारे. त्यावर, ‘मोदींना धर्माचे राजकारण करायचे आहे, मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे’ अशी टीका विरोधकांनी सुरू केली. ती अर्थहीन आहे. खरे तर मोदी यांना त्यापुढेही या विषयावर बोलायचे होते, पण वेळ उरला नाही म्हणून पुढचे मुद्दे बोलायचे राहिले त्यांचे. ‘आपल्याकडे देशप्रेम, राष्ट्रवाद याबाबतची प्रशस्तिपत्रके देण्याचा ठेका काही मंडळींनी घेतलेला आहे. ही प्रशस्तिपत्रके मुस्लिमांनाच दर वेळी द्यावी लागतात. यापुढे मुस्लिमांकडे अशी प्रशस्तिपत्रके कुणीही मागणार नाही,’ असे मोदी यांना सांगायचे होते, ते राहिले. ‘इस देश में रहना होगा.. वंदे मातरम कहना होगा, असा प्रेमळ आग्रह यापुढे मुस्लिमांकडे धरला जाणार नाही,’ असे मोदी यांना सांगायचे होते, ते राहून गेले. ‘आपल्याकडील लोकांनी काय खावे, काय खाऊ नये, याबाबत काही मंडळी विनाकारण दुराग्रही असतात. त्यात मुस्लिमांना अनेकदा त्रास होतो. मात्र, यापुढे असा आग्रह धरून लोकशाही मूल्यांची ऐशी की तैशी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, कुठल्याही दादरीत कुठलाही अखलाख हकनाक बळी जाणार नाही,’ असे मोदी यांना स्पष्टपणे सांगायचे होते, ते राहिले. ‘या वेळच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिलेली नसली तरी पुढील निवडणुकीत त्याची भरपाई केली जाईल,’ असे वचन मोदी यांना द्यायचे होते, तेही राहिले. योग्य वेळी ‘मन की बात’मध्ये या गोष्टींचा उच्चार ते करतीलच. तूर्तास तरी कब्रस्तान-स्मशान अशा जिवंत विषयाचा आधार घेत हिंदू-मुस्लीम धर्मीयांतील समानता वर्धिष्णु व्हावी, यासाठी त्यांनी केलेल्या विधानाचे स्वागतच करायला हवे.