हे असे कसे झाले? समाजमाध्यम हेच ज्यांच्या लोकप्रियतेच्या मोजमापाचे साधन, त्यांनाच अचानक अशी उपरती कशी झाली?.. त्यांनाच या माध्यमाचे भय का वाटू लागले? समाजमाध्यमांचा वापर करून निवडणुकीच्या लाटेवर स्वार होण्याची कमाल करणाऱ्या मोदीसेनेला आता याच लाटेचे तडाखे बसू लागले काय?.. राजकारणाच्या रणांगणात समाजमाध्यमांच्या तलवारी कधीच तळपल्या नव्हत्या. पण अचानक तीन-चार वर्षांपूर्वी समाजमाध्यमे हेच एक धारदार हत्यार मोदीसेनेच्या हाती आले आणि त्यांनी प्रतिपक्षाची दाणादाण उडविण्यास सुरुवात केली. काही फटक्यांतच अनेक जणांना गारद करणारे हे हत्यार दुधारी आहे हे त्यांच्या तेव्हा लक्षात आले नसावे काय?.. एका बाजूने समाजमाध्यमाची दुधारी तलवार फिरविताना, या हत्याराला गंज चढणार नाही याची काळजी त्यांनीच घेतली होती ना?. कदाचित, त्यामुळे, या हत्याराची दुसरी धारदार बाजूदेखील आपणच जपतोय हे त्यांच्या लक्षात आले नसावे. राजकारणाच्या मैदानात आपला अश्वमेध चौखूर उधळविण्याची आकांक्षा बाळगून अनेकांना आपले मांडलिक बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या त्यांच्या हाती तेव्हा तर हेच खरे हुकमी हत्यार होते.. मग अचानक असे काय झाले, की या हत्याराची त्यांनाच भीती वाटू लागली?.. हे हत्यार जपून वापरायला हवे याचा साक्षात्कार कसा झाला?.. भाजपचे अध्यक्ष अमितभाई शहा हे तर अशा माध्यमांच्या बेमालूम वापरात माहीर नेते असतानाही, या माध्यमांपासून जपून राहा असा सल्ला स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्याची वेळ त्यांच्यावर का आली?.. आता सर्वाच्याच हाती हे हत्यार आले असल्याने, प्रतिस्पध्र्याना नामोहरम करणे तीन वर्षांपूर्वी वाटत होते तेवढे सोपे राहिलेले नाही याची जाणीव झालेल्या अमितभाईंनी काही गमिनी कावा तर आखला नाही ना?.. सध्या ते म्हणे, छत्रपती शिवरायांचे चरित्र गुजरातीतून लिहिण्यासाठी सरसावले आहेत. म्हणजे गनिमी कावा हा शब्द त्यांनी ऐकला तरी असणारच! ..शिवाय, नरेंद्र मोदी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीत बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिवरायांच्या गनिमी काव्याच्या चार युक्तीच्या कानगोष्टी नरेंद्रभाईंनी अमितभाईंपर्यंत पोहोचविल्याच असतील.. म्हणूनच, प्रसंगी प्रतिस्पध्र्याला गाफील ठेवण्यासाठी चार पावले मागे जावे हा गनिमी काव्याचा पहिला सिद्धान्त अमितभाईंना आठवला असावा. आता ज्या हत्याराने आपण राजकारणाचे मैदान गाजविले, तेच हत्यार म्यान करून ठेवण्याऐवजी, त्याचा जपून वापर करा हा सल्ला स्वपक्षीय कार्यकर्त्यांना देताना, अमितभाईंना शिवचरित्रातील कोणता प्रसंग आठवला असावा यावर प्रतिस्पर्धी खल करू लागले असतील. तोवर त्यांच्या हातातील समाजमाध्यमाच्या हत्याराची धार बोथट व्हावी आणि तोच प्रसंग साधून आपले हत्यार पुन्हा परजावे असा गनिमी कावा तर अमितभाईंना सुचला नसेल ना?.. सध्या तरी, मोदीसेनेने मैदानात आणून ज्या हत्याराचा बोलबाला केला, ते बूमरँग झाल्याची समजूत अमितभाईंच्या पवित्र्यामुळे पसरली असेल. प्रतिस्पध्र्याच्या हुशारीची आता कसोटी आहे!