पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता हे मनावर घ्यावेच. त्यांच्या केवळ एका आवाहनाची गरज आहे. त्यांनी फक्त इतकेच म्हणावे की, ‘शहरांतील गृहनिर्माण सहकारी सोसायटय़ांच्या सचिवांनी सोसायटय़ांच्या विकासाचे सैनिक बनावे.’ देशाचा नेता असावा तर असा. जवळपास ६० वर्षे देश म्हणजे बजबजपुरी झाला होता. विकासाचे नाव नाही. देशाचे भाग्य थोर म्हणून मोदी प्रधानसेवक झाले. ते होताच संपूर्ण देशात कसे चैतन्य सळसळते आहे. या अशा सळसळत्या चैतन्यातून येणाऱ्या ऊर्जेला विधायक दिशा देणे हे काम नेत्याचे. मोदी ते बरोब्बर करीत आहेत. मध्यंतरी सनदी लेखापालांना त्यांनी आवाहन केले की, ‘देशाच्या आर्थिक विकासाच्या कामात सामील व्हा. कर वाचवण्याचे मार्ग जनतेस दाखवत बसण्यापेक्षा कर अधिकाधिक कसा गोळा होईल, ते बघा’. त्यामुळे गहिवरलेल्या काही सनदी लेखापालांनी तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू केली, असे कळते. आता अगदी परवापरवा मोदीसाहेबांनी राजधानी नवी दिल्लीतील कार्यक्रमात देशाच्या उद्योगजगतातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना.. म्हणजेच सीईओंना आवाहन केले ते ‘सैनिक बना’, असे. मोदीजींचे बोल ऐकून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांच्या बाहूंत स्फुरण आले. थ्री पीस कोटाआडची त्यांची छाती किमान ५० ते कमाल ५६ इंच इतकी फुगली. ‘आता लगेचच डोकलामला जाऊन त्या चिन्यांना चांगला धडा शिकवू या’, म्हणून ते निघालेही होते. पण मोदीजी ‘सैनिक बना’, असे म्हणत आहेत, ते खरेखुरे सैनिक नव्हे, तर ‘विकासाचे सैनिक’ असे त्यांना म्हणायचे आहे’, हे या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि मग अचानक फुगलेल्या छातीमुळे फाटण्याची शक्यता असलेले कोट वाचले. पण आता येत्या काही दिवसांत बघा, देशातील तमाम मुख्य कार्यकारी अधिकारी विकाससैनिकासारखे वागायला लागतात की नाही. सध्या भले मेक इन इंडियाचा वाघ दुर्मुखलेल्या चेहऱ्याचा दिसत असेल, पण एकदा का हे विकाससैनिक मैदानात उतरले की हा वाघ झेप घेण्यास तयार होईल. सध्या भले स्टार्ट अप योजना रडतखडत चालू असेल, पण एकदा का विकाससैनिकांनी पुढाकार घेतला की ही योजना वेगात धावू लागेल. ‘असेच आवाहन मोदी यांनी गृहनिर्माण सोसायटय़ांच्या सचिवांना करावे’, असे प्रारंभी म्हटले आहे ते याच दृष्टीने. या सचिवांनाही सैनिकपद मिळाले की सोसायटय़ांतील समस्यांशी लढण्यासाठी त्यांना दहा हत्तींचे बळ येईल. मग कुणी देखभाल खर्चच थकवतो आहे, कुणी पाण्याचे देयकच भरत नाही, कुणाच्या घरातील बेसिनच तुंबले आहे.. असल्या समस्यांची उकल करण्यासाठी ही सचिव मंडळी त्वेषाने लढू लागतील. सोसायटी म्हणजे जणू आपल्या राष्ट्राचे लघुरूप, अशा भावनेतून ते काम करतील. त्यातून सोसायटय़ा सुधारतील, शहरे सुधारतील, जिल्हे सुधारतील, राज्ये सुधारतील आणि अंतिमत राष्ट्र सुधारेल. राष्ट्राच्या विकासात सर्वसामान्यांचा सहभाग हवा तो असा. तेव्हा मोदीजी, कधी करताय आवाहन?