समारंभ दणक्यात करणे ही नितीनभाऊंची नेहमीची सवय आहे. कुणी काहीही म्हणोत, नितीनभाऊंची प्रत्येक कृती थाटामाटात होते, साजरी होते. त्यांचा साठावा वाढदिवसही अगदी सर्वपक्षीय नेत्यांच्या मांदियाळीत साजरा झाला. आता चर्चा सुरू झाली ती एकाच्या अनुपस्थितीची तर दुसऱ्याच्या हिरमुसलेपणाची. स्वपक्षीय नेत्यांना न बोलता त्यांची जागा दाखवून देण्यात वस्ताद म्हणून ओळखले जाणारे अमितभाई शहा शब्द देऊनही संघभूमीकडे फिरकले नाहीत. ते का आले नाहीत, असा प्रश्न भाऊंपेक्षा इतरांनाच जास्त पडलेला दिसला. राजकारणशिरोमणी शरद पवारांना या गैरहजेरीचे आश्चर्य वाटले तर सुशीलकुमार शिंदेंनी नितीनभाऊंच्या प्रगतीमध्ये पक्षच आडवा आला असे जाहीरपणे बोलून दाखवले. दिल्लीतून केवळ विजय गोयल तेवढे आलेले दिसले. ते नेमके कुणाचे प्रतिनिधी होते, मोदींचे की शहांचे हे शेवटपर्यंत कुणाला कळलेच नाही. मोदी व शहांच्या राजकारणात हे कळू न देण्याचे प्रस्थ अलीकडे फारच वाढले आहे. सरळसोट स्वभावाच्या नितीनभाऊंना याचा जरूर त्रास होत असेल, पण शनिवारी ते सत्कारमूर्ती होते. त्यामुळे शांत राहणे त्यांना भाग होते. बोलण्याची उबळ येऊनही शांत राहावे लागणे हे फारच वाईट! मग माणसात आणि मेणाच्या पुतळ्यात फरक तो काय? म्हणूनच असेल कदाचित, पण भाऊंच्या कार्यक्रमात मेणाचा पुतळा होताच. या पुतळ्यामुळे फसगत झाली ती राजकुमार बडोलेंची. हे सामाजिक न्यायमंत्री भाजपत तसे नावाचेच. पक्षातल्या शकुनीमामाच्या गोष्टी त्यांना अजून अवगत व्हायच्या आहेत. तर असे हे साधेसरळ बडोले गडकरींना भेटण्याएवजी थेट त्यांच्या पुतळ्याजवळ जाऊन हस्तांदोलनासाठी हात समोर करते झाले! इतरांच्या लक्षात आल्यावर हास्यकल्लोळ उडाला आणि बडोले खजील झाले.  पण त्यांना खजील होण्यातले कारण काय? नाहीतरी शीर्षस्थ नेतृत्वाने अनेकांना मेणाचे पुतळेच बनवून टाकले आहे. पक्षात राहायचे असेल तर पुतळे बनून राहा असा संदेशच अमितभाईंनी नागपुरात न येताही या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला असा अर्थ काढायला काय हरकत आहे? तिकडे काँग्रेसमध्ये मेणाहून मऊ  वागावे लागत असल्यामुळे अस्वस्थ असलेले नारायण राणे भाऊंच्या कार्यक्रमासाठी आले होते. किमान या व्यासपीठावर तरी संधी मिळेल, अशी आशा बाळगून ते व्यासपीठावर विराजमान झाले. पण  संयोजकांनी त्यांना बोलू दिले नाही.  जिथे आलो तेथेही पुतळे, जिथे जायचे आहे तिथेही पुतळे हे बघून नेहमी तोफ डागण्याची सवय असलेल्या राणेंना किती वैताग आला असेल याची कल्पना न केलेलीच बरी! राजकारणात पुतळ्यांनाच महत्त्व येत असेल आणि तेही कधीही विरघळून जाईल अशा मेणाच्या; तर आपले काय, असा प्रश्न राणेंना पडला असेलच. पण अमितभाईंच्या गैरहजेरीमुळे धास्तावलेल्या तमाम भाऊलोकांनाही पडला असेल. आता या पुतळ्याच्या राजकारणावर तमाम भाऊलोक नागपुरी मारबतीच्या माध्यमातून उतारा शोधणार आहेत म्हणे!