मानवाच्या आयुष्याचा मार्ग कितीही काटेरी असला, जीवनपथावर कितीही संकटे आली, तरी जो खचून जात नाही त्यालाच खरा बाजीराव (किंवा बाजीगर) असे म्हणतात. व्हॉटसअ‍ॅपवरील सुप्रभात संदेशात शोभावे असे हे घासून गुळगुळीत झालेले सुविचारी वाक्य आहे याची आम्हांस नम्र जाणीव आहे. तथापि आपले वयोवृद्ध नेते ओमप्रकाश चौतालाजी यांचे नाव समोर येताच आम्हांस सुचले ते नेमके हेच सुवाक्य. याचे कारण म्हणजे त्यांनी नुकतेच केलेले दीपप्रज्वलन. तसे दिवे अनेक नेत्यांनी लावले आहेत. ओमप्रकाशजीही त्यात कुठे कमी नाहीत. ‘आत’ गेले ते त्यामुळेच. पण त्यातही त्यांचा वेगळेपणा असा की घोटाळा केला तोही सुसंस्कृत असाच. म्हणजे एरवीचे नेते कसे कुठल्या तरी व्यापक (किंवा व्यापम) सिंचनादी घोटाळ्याचे भाग असतात. काहींनी तर खडू-फळ्यात पैसे खाल्ले. ओमप्रकाशजींनी शिक्षकांशी संबंधित घोटाळा केला. विद्याक्षेत्राबद्दलची त्यांची तीच ओढ पुन्हा दिसली ती वयाच्या ८२व्या वर्षी, तीही कारावासात असताना. हे खरे तर त्यांचे आरामाचे वय. त्याकरिता कारागृहासारखे सुरक्षित व सर्व सोयींनी सुसज्ज असे स्थळ अन्य नाही. परंतु ओमप्रकाशजींनी तेथेही आपले विद्याव्रत सोडले नाही. कारागृह ही खरोखरच शिकण्याची जागा आहे हे त्यांनी आपल्या कर्मयोगातून दाखवून दिले. तेथून त्यांनी बारावीची परीक्षा दिली आणि ते त्यात उत्तीर्णही झाले. आता यापूर्वी काही नेते कारागृहात राहून पुस्तके वगैरे लिहीत असत, या गोष्टींची आठवण येथे कोणी करून देईल. कोणास टिळकांचे गीतारहस्य आठवेल, तर कोणास नेहरूंचे भारताचा शोध आठवेल, तर कोणास सावरकरांच्या कविता आठवतील.. परंतु ओमप्रकाशजींच्या कार्यकर्तृत्वाची तुलना या नेत्यांशी कदापि होऊ शकत नाही. एक तर पुस्तक या प्रकारास हल्ली राजकारणात फार कोणी विचारीत नाही. त्यापेक्षा अधिक ज्ञान हे गाइडांत असते हे त्यांना माहीत असते. परीक्षा देणे ही खरी अवघड बाब. त्यासाठी फारच कष्ट उपसावे लागतात. यावर कोणी म्हणेल, की तुरुंगातल्या परीक्षेत कसले आले कष्ट? तेथे कॉपी केली तर अटक थोडीच होईल? आधीच आत असलेल्यास आणखी किती आत घालतील? तर तसे नसते. कारागृहात पोलीसही असतात. तेव्हा ओमप्रकाशजींनी खरोखरच अभ्यास करून ती परीक्षा दिली असणार. त्यात ते उत्तीर्णही झाले. यातून एकच दिसले, की जीवनपथावर कितीही संकटे आली, तरी खरे राजकारणी खचून जात नाहीत. कारण ते खरे बाजीगर असतात.. किंवा आपण त्यांना मुन्नाभाई असेही म्हणू शकतो.