चि. राहुलबाबा गांधी हे काँग्रेसचे जन्मजात नेते आहेत, भावी अध्यक्ष आहेत व त्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष नवनवे विक्रम करणार आहे, हे अवघा देश जाणतो. तेव्हा ते राजकारणी आहेत याबाबत संभ्रम असण्याचे कारण नाही. परंतु ते भाषाप्रभूही आहेत, ही बाब मात्र अनेकांना माहिती नव्हती. ती सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या ताज्या जबानीने स्पष्ट झाली. मागे भिवंडीतील सभेत त्यांनी रा. स्व. संघावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते, ‘संघाच्या लोकांनी गांधीजींना गोळ्या घातल्या आणि आज त्यांचेच लोक गांधीजींबद्दल बोलत आहेत.’ गालावर वाढलेली खुरटी दाढी, अंगात पांढरा सदरा, त्याच्या बाह्य़ा कोपरापर्यंत मुडपलेल्या अशा अवतारात त्यांनी जेव्हा हे स्फोटक विधान केले असेल, तेव्हा उपस्थितांच्या अंगावर रोमांचच फुलले असतील यात शंका नाही. त्यांच्या भाषणाने हल्ली अनेकांना अशी भावना होते म्हणे. त्यास नाइलाज आहे. पण त्यांचे हे विधान संघाच्या कोणा भिवंडीकर नेत्याला चांगलेच झोंबले. त्यांच्या मते यातून संघाची बदनामी झाली. संघास गांधी हे राष्ट्रपिता म्हणून मान्य नसतील कदाचित, संघास गांधीजींची अहिंसा वगैरे तत्त्वे मान्य नसतील कदाचित, संघास गांधीजींची धार्मिकता मान्य नसेल कदाचित, किंबहुना संघास सारेच्या सारे गांधी अमान्यच असतील कदाचित, परंतु संघासाठी ते प्रात:स्मरणीय आहेत. तेव्हा संघ काही त्यांना गोळ्या घालणार नाही. तरीही राहुलबाबांनी असा आरोप करावा हे अतीच झाले. तेव्हा त्यांच्याविरोधात संघाच्या लोकांनी न्यायालयात खटला गुदरला. म्हणाले, माफी मागा. तेव्हा चि. राहुलबाबा कडाडले, जमणार नाही! त्यांचे ते शौर्य, धैर्य पाहून त्यांचा कौतुकाने गालगुच्चाच घ्यावा, अशी अनेकांना भावना झाली होती म्हणतात. अनेकांना वाटले, आता राहुलजी तत्त्वासाठी तुरुंगात जाणार. मग त्याचा काँग्रेसला राजकीय फायदा मिळणार. मग काँग्रेसची सत्ता येणार. परंतु चि. राहुलबाबा म्हणजे असे अंदाजाच्या चिमटीत बसणारे व्यक्तिमत्त्व नाही. न्यायालयात ऐन वेळी त्यांच्यातील भाषाप्रभू जागा झाला. शब्दांचा कीस पाडत ते म्हणाले, की मी कुठे म्हणालो की हत्या संघाने केली? ती तर संघाच्या काही लोकांनी केली. किती छान युक्तिवाद! काँग्रेसने तर याचे पेटंटच घेतले पाहिजे. म्हणजे ‘भ्रष्टाचार कुठे काँग्रेसने केला? तो तर काँग्रेसच्या लोकांनी केला,’ असे प्रत्येक बाबतीत ताणता येईल. तर आता लोक म्हणू लागले, की चि. राहुलबाबांनी कोलांटउडी मारली. त्यांना दीपा कर्माकरऐवजी ऑलिम्पिकमध्ये पाठवायला हवे होते. पण ते तसे मुळीच नाही. राहुलबाबा हे एक कसलेले सेनापती आहेत आणि असा सेनापती कोणतीही गोष्ट अंगाला लावून घेत नाही. अशा सेनापतीचा म्हणूनच कधीही पराभव होत नाही. पराभूत होते ती त्याची सेना. आता अशा सेनापतीला लोक शेंदाड शिपाई म्हणतात, परंतु त्याला नाइलाज आहे.