जे अनेकांच्या मनात होते, जे अनेकांच्या असलेल्या डोक्यातही होते, जे खुलेपणाने बोलायचे तर कसेसेच वाटत होते, म्हणून जे समाजमाध्यमांतून ‘आले तसे पुढे धाडिले’ म्हणत पसरविले जात होते, तेच थोर न्यायसेवक व राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र शर्मा यांनी सांगितले हे बरेच झाले. त्यामुळे अनेकांस पोटातील गुबारा निघावा तशी भावना झाली असेल. खूप दिवस साठून राहिलेले हे विचार. परंतु या देशातील विज्ञानवाद्यांच्या असहिष्णुतेमुळे, दहशतीमुळे कित्येकांनी ते तसेच दाबून ठेवले होते. हा विचारस्वातंत्र्यावरील केवढा मोठा हल्ला. तोंड दाबून बुक्क्यांचा मारच तो. म्हणजे आपण एकूण विज्ञानाला कसे मस्तपैकी धर्माचे अधिष्ठान पाहिजे म्हणत जे शास्त्र शिकलो, त्याहून विपरीत हे काही तरी सांगणार. आपण काही बोलू गेलो तर आपल्याला पुराणातली वानगी पुराणात ठेवा, असे सांगणार. अंधश्रद्धाळू म्हणून हिणवणार. परंतु आता कसे छान मोकळे वातावरण झाले आहे. त्याची सुरुवात झाली ती भारतीय विज्ञान काँग्रेसच्या मुंबईतील अधिवेशनातून. तेथे विचारस्वातंत्र्याची जी काही प्राचीन विमाने उडाली ते पाहून अनेकांस धन्य धन्य वाटले. त्यानंतर पुढच्याच अधिवेशनात थोर विचारवंत व इतिहासतज्ज्ञ मा. श्री. नरेंद्र मोदी, प्रधानसेवक, भारत सरकार, यांनी जगातील पहिल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची माहिती सोदाहरण दिली आणि अनेकांची पुराणकथांकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. आतापर्यंत ज्यांना संहारकर्त्यांच्या रूपात पाहिले जात होते, किंबहुना तशा कथाच पिढय़ान्पिढय़ा सांगितल्या जात होत्या, ते एक निष्णात शल्यचिकित्सकही होते हे आता सर्वास माहीत झाले. अशा प्रकारे खरे विज्ञान समोर येत गेले आणि येथील वैचारिक गुबाराच निघाला. शर्माजींनी तर त्याचा पुरताच निचरा केला. याचा खरा परिणाम होणार आहे तो यापुढील वैज्ञानिक संशोधनावर. किंबहुना मोदीजींनी तातडीने शर्माजींची नियुक्ती आपले वैज्ञानिक सल्लागार म्हणून करण्याची गरज आहे. त्यांच्या सल्ल्याने येथील वैद्यकीय क्षेत्राला एक नवी दिशा आपणांस देता येईल. रुग्णालयांमध्ये गाई आणून बांधता येतील. रुग्ण आला की टोचा त्याला गोमूत्राचे इंजेक्शन. द्या शेणाच्या पुडय़ा बांधून. अस्सल स्वदेशी उपचार. बहुराष्ट्रीय फार्मसी कंपन्यांचा तर माजच उतरेल याने. शिवाय प्रजननशास्त्रातही काही महत्त्वपूर्ण संशोधन करता येईल. मोर हा पक्षी आजन्म ब्रह्मचारी असतो. त्याचे केवळ अश्रू प्राशन करून लांडोरी गर्भारशी राहतात. हे शर्माजींचे वैज्ञानिक सत्य. त्यावर अधिक संशोधन केल्यास त्यातून अनैतिकतेची मोठीच समस्या सुटू शकेल. आज अ‍ॅण्टी रोमियो पथके काम करत आहेत. उद्या अ‍ॅण्टी मॅरेज पथके तयार करता येतील. त्यातून घटस्फोटासारख्या अभारतीय समस्येचे पूर्ण निराकरण होईल, हा आणखी एक फायदाच. यातून देश विश्वगुरू होण्यास वेळ नाही लागणार. तेव्हा ज्याप्रमाणे मोदीजींनी प्रतिष्ठित केंद्रीय संस्थांवर अनेक थोर थोर विभूतींची नियुक्ती केली आहे, त्याचप्रमाणे शर्माजींसारख्या राष्ट्रीय संपत्तीचीही एखाद्या मोठय़ा वैज्ञानिक संस्थेवर वर्णी लावावी. किमान वाजपेयींनी दिलेल्या ‘जय विज्ञान’ या घोषणेला श्रद्धांजली म्हणून तरी त्यांनी हे करावे..