आमच्या हे एक ध्यानी आले आहे, की सर्वसामान्य मनुष्यप्राण्यांस बेल या गोष्टीसंबंधीचे फारसे ज्ञान नसते. अनेक जण तर शुद्ध अडाणी असतात याबाबत. कां की, त्या पापभीरू, अश्रापांचा कधी संबंधच येत नाही त्याच्याशी. वस्तुत: बेल ही एक अत्यंत उपयुक्त गोष्ट असून, वृत्तपत्रीय मराठीत त्यास जामीन असेही म्हणतात. याची उत्पत्ती अशी सांगितली जाते, की बेल हे आपल्या देशातील जमिनीवरचे वास्तव असल्यामुळे त्यास जामीन असे म्हटले जाते. परंतु त्यात फारसे तथ्य नसावे. काही मूढजन तर महादेवास वाहण्यात येणारा बेल व भारतातील प्रचलित बेल यांची सरमिसळ करताना दिसतात. परंतु ते अयोग्य आहे. शिवरात्रीस आपण विकत घेऊन वाहतो तो बेल वेगळा व काही अतिसामान्यांना मिळतो तो बेल वेगळा. असे असले, तरी त्यांचे अनेक गुणधर्म मिळतेजुळते असल्याचे हिमाचल प्रदेशात करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन आयुर्वेदिक आहे. मात्र त्याचा पतंजलींशी संबंध आहे की काय यावर सध्या संशोधन सुरू आहे. तर त्या आधीच्या संशोधनानुसार, प्रचलित बेल हाही सहसा महादेवांस मिळतो. हे महादेव अर्थातच या भूतलीचे. बेल-फळाचे सेवन शरीरासाठी ज्याप्रमाणे लाभदायक असते, त्याचप्रमाणे नवराजकीय आयुर्वेदानुसार या बेलचे लाभणे हेही शरीरासाठी फायदेशीर असते. त्यातून हृदयाला बळ, मेंदूला स्फूर्ती मिळते, तसेच त्यात सात्त्विक शांती प्रदान करण्याचाही श्रेष्ठ गुण आहे. आता हे बेल-फळ सर्वानाच मिळते का? काही अभाग्यांसाठी ‘मा बेलफळेषु कदाचन’ असेच असते. त्यांनी कितीही याचना केली तरी त्यांस ते मिळतच नाही. कां की त्याकरिता आधीची काही पुण्ये करावी लागतात. ती नसल्याने त्यांस नरकयातना भोगणे भागच असते. पुण्यवंतांचे मात्र तसे नसते. तोंडात चांदीचा चमचा व त्यात बेल-फळच घेऊन येतात ते. काहींना तर म्हणे आधी बेल मिळतो. परंतु अखेर हे ज्याचे त्याचे भाग्य असते. परवाचे दिशी या पुण्यभूचे राष्ट्रीय प्रधानसेवक नरेंद्रजी मोदीजी यांनी हिमाचल प्रदेशात याच बेल-फळाविषयी भाष्य केले. वस्तुत: हिमाचलात सफरचंदासारख्या फळांविषयी ते बोलले असते तर अधिक शोभून दिसले असते. परंतु त्यांस शोभा करावयाची होती ती वेगळीच. म्हणून त्यांनी बेलफळाचा उल्लेख केला. युवराजांना व त्यांच्या मातोश्रींना बेलप्राप्ती झालेली आहे हे अहोआश्चर्यम् वृत्त त्यांनी त्यासमयी लोकांस सांगितले. आता मोदींच्या राज्यातही अशा व्यक्तींना बेलफळ मिळणे हे काही चांगले नाही. परंतु बेलफळ हेच जमिनीवरचे वास्तव असल्याने त्यांचा तरी काय इलाज चालणार? त्यांच्या हातात तरी बेल वाटण्याशिवाय अन्य काय आहे?