भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर करण्यात आले आणि ते पंतप्रधान झाल्यानंतर आता प्रत्येक पक्षाला आपल्या पंतप्रधानपदाच्या वा मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करणे ही निवडणूक विजयाची गुरुकिल्ली वाटू लागली आहे. बहुधा त्यामुळेच तिसरी आघाडी नावाच्या शिळ्या संकल्पनेला पुन्हा ऊत आणण्याचे प्रयोग सुरू झाल्याबरोबर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. अर्थात सगळ्याच तुरी बाजारात असल्याने याबाबत कोणी कोणास मारायचे हा प्रश्नच आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या बाबत मात्र तसे म्हणता येणार नाही. त्या निवडणुकीचा पदरव आता सत्तेच्या गल्ल्यांमधून घुमू लागला आहे. त्यामुळे काँग्रेसने तातडीने या निवडणुकीबाबत पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. त्याची सुरुवात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीची माळ कोणा भाग्यवंताच्या गळ्यात घालायची या प्रश्नापासून झाली आहे. खरे तर काँग्रेसमध्ये असे प्रश्न पडण्याची पद्धत नाही. ते पडण्यापूर्वीच दिल्लीत जी पक्षश्रेष्ठी नामक कर्तुमकर्तुम सत्ता असते तिच्याकडून २१ अपेक्षित उत्तरे आलेली असतात. मात्र नव्या रीतीनुसार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे सकलगुणमंडित राजपुत्र चि. राहुलबाबा गांधी यांचे नाव जाहीर करावे, अशी एक टूम काढण्यात आली आहे. तिचे शिल्पकार आहेत भारताचे राजकीय मिडास प्रशांत किशोर. हे किशोर आणि त्यांची आयटीकुमारांची फौज यांनी मिळून २०१४च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक महाप्रचाराचा महारथ सुसाट पळविला होता. ‘चाय पे चर्चा’ हे किशोर आणि कुमारांचेच अपत्य. मोदींचा महारथ इंद्रप्रस्थास पोचविल्यानंतर हे प्रशांत किशोर थेट मोदीविरोधक नितीशकुमार यांच्या गोटात जाऊन पोहोचले. तेथे त्यांनी पर्चा पे चर्चा घडवून आणली. आता ते चि. राहुलबाबांबरोबर उत्तर प्रदेशात ‘चने पे चर्चा’ घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. या किशोर-हट्टामागे, तिकीटबारीवर कोणताही शिनुमा हिट करायचा असेल तर त्यासाठी नायक म्हणून एक चांगला चेहरा असावा लागतो असे बॉलीवूडी शास्त्र आहे. निवडणूक जिंकायची असेल तर त्यासाठी चेहरा हवा. काँग्रेसमध्ये आजमितीला असे दोनच चेहरे आहेत. एक म्हणजे चि. राहुलबाबा आणि दुसरा सौ. प्रियंकाताई वढेरा. पण स्वत: वढेराताई अनुत्सुक असल्याने उरतात ते राहुलबाबाच. तेही फार उत्सुक आहेत अशातला भाग नाही. याचे कारण त्यांचा चेहरा चिकणाचुपडा नाही असे नाही, तर त्यांच्या दृष्टीने तो देशपातळीवर नेण्याच्या योग्यतेचा आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या फुफाटय़ात जाऊन हात दाखवून अवलक्षण कशाकरिता करायचे असे त्यांना वाटू शकते. परंतु एकदा वय झाले की प्रत्येकाला बोहल्यावर चढावेच लागते. तेव्हा राहुलबाबांनी एकदा तरी या आर-पारच्या लढाईत उतरावेच. पुन्हा एकदा काँग्रेसचे कारगिल झाले, तर राहुल यांना दुसऱ्या एखाद्या राज्यात हलवता येईल आणि भाजपच्या साधू-साध्वी आदी वाचाळांच्या आशीर्वादाने काही भले झालेच, तर हा चेहरा घेऊन विपश्यनेस जाता येईल. या विपश्यनेचा कालावधी मात्र जरा मोठाच असेल. यातून काहीही झाले तरी प्रशांत किशोर यांची ही खेळी काँग्रेसजनांच्या फायद्याचीच ठरेल, हे नक्की.