राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला आपण राज्यात किंवा केंद्रात किमान मंत्री तरी व्हायलाच हवे, अशी इच्छा असते. ती चुकीचीही नव्हे. पण राजकारणात कोणाच्या पदरात कधी आणि काय पडेल आणि त्या पदराला खालून कोण, कधी आणि केव्हा भोक पाडेल, हे कधीच सांगता येत नाही. कालांतराने अशा ज्येष्ठ झालेल्या परंतु राजकीयदृष्टय़ा फारसे उपयोगी नसलेल्यांच्या पदरात काही तरी किडूकमिडूक टाकण्याची भारतीय परंपरा आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकांत राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला फार महत्त्व असे. तो मुख्यमंत्र्याएवढाच महत्त्वाचाही मानला जाई. कालांतराने त्यात इतका फरक पडत गेला, की हे पद ना धड शोभेचे, ना धड फायद्याचे अशी अवस्था झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात हे असले पद पडले आहे. त्यामुळेच त्यांना सरकारी सेवांचा लाभ हवा आहे. त्यांना असेही वाटते, की आपण हा सारा पक्ष हाकतो आहोत आणि आपलाच शब्द पक्षात अंतिम राहणार आहे. करतात काही जण अशा वल्गना, त्याला काय करणार? रावसाहेबांनी राज्यातील भाजप-सेना युती तोडण्याची भाषा एकदा, दोनदा नव्हे, तर अनेकदा केली. येत्या महापालिका निवडणुकांत भाजप स्वबळावर लढेल, असे त्यांनी जाहीरही करून टाकले. सत्तेत येताच शहाणपण अंगी आलेले पक्षाचे कार्यकर्तेही काही कमी नाहीत. त्यांनी सावध पवित्रा घेतला. कोणीच हलेना, कोणीच पळेना. ज्यांना आपल्या राज्यातही फारशी किंमत नाही आणि ज्यांनी निवडणूक लढवण्याची हिंमतही दाखवली नाही, अशा एके काळच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पुण्यात येऊन रावसाहेबांच्या वक्तव्याचा समाचार घ्यावा, यात नवल ते काय? हे वेंकय्या नायडू महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. प्रभारी म्हणजे मराठीत ‘तात्पुरता’. तरीही ते कायमचेच का समजले जातात, हे एक गूढच. असो. वेंकय्या म्हणाले की भांडणे होतच असतात. ती चर्चा करून मिटवायला हवीत. हे असे काही फक्त भाजपतच होते असे नाही. अशी परंपरा निर्माण करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस. तेथे प्रभारींच्या पुढे पुढे करून वाटेल ते पदरात पाडून घेणारे भरपूर. हे प्रभारी त्या त्या राज्यातील सारी राजकीय ताकद जणू आपल्याच हाती असल्याच्या आविर्भावात वागत आलेले. मग ते ए. के अँटनी असोत की मोहन प्रकाश. ज्यांना सार्वजनिक जीवनात फारशी लढाई करावी लागली नाही, पण जे श्रेष्ठींच्या जवळचे आहेत, अशांना ही पक्षांतर्गत सत्ताकेंद्रे बहाल करण्याची काँग्रेसी परंपरा आता भाजपतही आलेली असावी. दानवे यांचे दु:ख खरे तर वेंकय्यांना समजायला हवे! पण त्यांनी तर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत येऊन राज्यातील युती तोडण्याच्या रावसाहेबांच्या स्वप्नांचा पार चुराडा करून टाकला. पक्षाचे राज्यातील कार्यकर्ते त्यामुळे अधिकच संभ्रमात पडले, तर नवल काय?