हे अति झाले. गोव्यातील एक मंत्री थेट साध्वी सरस्वती यांच्यावर टीका करतो आणि त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे त्याचीच री ओढतात. साध्वी सरस्वती यांच्या विधानात असे काय होते टीका करण्याजोगे? त्या आपले इतकेच म्हणाल्या की, ‘जे कुणी गोमांस खात असतील त्यांना फासावर लटकवायला हवे.’ बस्स. इतके साधेसुधे, निरुपद्रवी वाक्य. तर त्यावर गोव्यातील मंत्री विजय सरदेसाई म्हणतात कसे, की म्हणे, ‘या साध्वींसारखी किती तरी माणसे गोव्यात येत असतात, पण ती असतात पर्यटकांसारखी. त्यांना गोव्याच्या मातीतील गुण ठाऊक नसतात.’ साध्वींना बोल लावणारे सरदेसाई यांना खरे तर मनोहर पर्रिकर यांनी सुनवायला हवे होते, पण झाले उलटेच. पर्रिकरांनी सरदेसाईंचीच पाठराखण केली. म्हणाले, ‘गोव्यातील कायदा-सुव्यवस्था स्थिती बिघडेल असे कुणी काही करीत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही.’ मुळात गोव्यात आल्यावर शहाळ्याचे पाणी पिऊन आणि दुधी भोपळ्याची भाजी खाऊन परत जाणे हे अगदी सहजशक्य आहे. शहाळी मुबलक आणि दुधी भोपळाही कुठेही मिळावा असा. भाजी आवडत नसेल तर तुपाच्या फोडणीचे सात्त्विक भरीतही छान लागते दुधी भोपळ्याचे. एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी. गोव्यात यायचे म्हणजे गोंयकार होऊनच यायचे आणि गोंयकार होऊनच राहायचे, अशी काही सक्ती नाही. गोव्यात यायचे म्हणजे गोंयकार होऊनच खायचे आणि गोंयकार होऊनच प्यायचे, अशीही सक्ती नाही. गोवा हे तर विशाल राष्ट्रातील एक छोटेसे राज्य. या अख्ख्या राष्ट्रात गोमांसबंदी व्हावी, अशी केंद्रातील सरकारची इच्छा असताना त्यास विरोध करणारे गोवा कोण? आणि शेवटी प्रश्न संस्कृतीचा आहे. असेल गोव्याची संस्कृती वेगळी, पण म्हणून ती तशीच कायम राहावी, असे नाही ना. संस्कृती म्हणजे जनविचारांचा, आचारांचा एक वाहता प्रवाह. वेळोवेळी तो बदलणारच. त्यामुळे गोव्यानेही आता बदलायला हवे, पण गोव्याने आपली मोकळीढाकळी संस्कृती कायम राखावी, असा विचार करणाऱ्या कट्टरपंथीयांचा एक प्रवाह आहे. तो ही संस्कृती बदलण्यात आडकाठी आणतो आहे. त्यांना वठणीवर आणायला हवे खरे तर, पण येथे उलटेच. पर्रिकरांच्या मंत्रिमंडळातील मंत्री (ते भारतीय जनता पक्षाचे नसून गोवा फॉरवर्ड पक्षाचे असले म्हणून काय झाले?) गोव्यात परिवर्तनाची लाट आणू पाहणाऱ्या साध्वी सरस्वती यांच्या विधानांना विरोध करतात आणि नंतर पर्रिकरही साध्वींचे नाव न घेता कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे आणतात. ही प्रतिगामी शक्तींची दडपशाही आहे शुद्ध. ‘देशात असहिष्णुता वाढते आहे’, अशी ओरड करणारे आता गप्प का? त्यांनी पुढे येऊन हा मुद्दा लावून धरायला हवा. गोव्यातील जनतेनेही या साध्वीकृत क्रांतिचक्राचा स्वीकार करायला हवा. त्यातच त्यांचे आणि आपल्या राष्ट्राचेही हित सामावले आहे.