तर, आता असे पाहा की हवेतून जाणारे विमान ही काही खाबुगिरीची जागा नव्हे. आपले माजी मंत्री प्रफुल पटेल यांना विचारून बघा हवे तर. आपापल्या जागेवर शहाण्यासारखे बसावे. हवाई सुंदऱ्यांनी सांगितल्यानंतर आपले पट्टे बांधावेत. खिडकीची जागा असल्यास ढगांचे व धरतीचे सौंदर्य निरखावे. आपले गंतव्य स्थान आल्यानंतर उतरून चालू पडावे. या प्रवासात खाण्यापिण्याचे कसले चोचले? समोर जे येईल ते गोड मानून, उदरभरण हे यज्ञकर्म आहे, याचे भान ठेवत चार घास खावेत. त्यामुळे इकॉनॉमी वर्गातील विमान प्रवाशांच्या जेवणातून (एक प्रकारची) कोशिंबीर (ज्यास विमानात ‘सलाड’ म्हणतात व विमानाबाहेर बरेच लोक ‘सॅलड’ असे म्हणतात) बाद करण्याचा जो विचार एअर इंडियाने चालविला आहे तो योग्यच आहे. हा असा विचार करण्यामागील एअर इंडियाचे गणित वेगळे आहे, हे खरे. त्यांचा मुद्दा आहे तो काटकसरीचा. कंपनीचा तोटा पोहोचलेला जवळपास ५० हजार कोटी रुपयांवर. कर्ज जवळपास ५५ हजार कोटी. यावर मात करायची तर काटकसर हवीच. विमान प्रवाशांच्या खानपान सेवेतून कोशिंबीर बाद केल्याने त्यावरील खर्च वाचेल. त्याशिवाय इकॉनॉमी वर्गातील प्रत्येक प्रवाशासाठी ‘शुभयात्रा’ हे मासिक ठेवण्याऐवजी त्याच्या २५ प्रतीच ठेवण्याचाही विचार आहे. प्रती कमी झाल्या की विमानाचे वजन तेवढे कमी होईल. वजन कमी झाले की विमान प्रवासाला कमी इंधन लागेल. इंधन कमी लागले की पैसे वाचतील असे हे गणित. विमान म्हणजे काही  आपली लोकल नाही. भरा वाट्टेल तेवढे प्रवासी आणि चला. विमानाचे वजन वाढले की त्यासाठी जास्त इंधन लागते. खरे तर विमानाचे वजन कमी करण्यासाठी इतरही अनेक उपाय आहेत. ते केले तर प्रवासासाठी लागणाऱ्या इंधनात नक्कीच बचत होईल. विमानातील आसनांचेच वजन केवढे असते. इतकी भरभक्कम आसने प्रवाशांसाठी ठेवण्याऐवजी साध्या प्लॅस्टिकच्या खुच्र्या ठेवण्याबाबत एअर इंडियाने विचार करायला हवा किंवा मग ज्याने त्याने येताना आपापली खुर्ची घेऊन यावी, असा नियम करावा व खुर्चीचे वजन जेवढे जास्त तेवढे जास्त पैसे आकारावेत. म्हणजे मग प्रवासी आपसूकच हलक्या खुच्र्या घेऊन येतील. अगदी जवळचा प्रवास असेल तर उभ्याने प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना देण्यावरही विचार करण्यास हरकत नाही. म्हणजे खुच्र्याचेही वजन नको व्हायला. शिवाय विमान चालवण्यासाठी दोन-दोन विमानचालक असतात. ते कशाला? त्यापेक्षा एकच विमानचालक असावा. तेवढेच एका माणसाचे वजन कमी. तर, करायचे म्हटले तर असे किती तरी कल्पक उपाय आहेत. एअर इंडियाने फेसबुक वा व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमातून असे उपाय सुचविण्याचे आवाहन  करावे. त्यातून नक्कीच काही चांगले उपाय हाती लागतील आणि मग सारा तोटा दूर होऊन एअर इंडिया पुन्हा दिमाखात भरारी मारेल यात शंका ती काय..