सत्तर वर्षांवरील व्यक्तींनी क्रिकेटशी निगडित संघटनांमधील पदांवर राहू नये, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने केल्यानंतर त्याचा आदर करून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. या समितीत ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या न्यायमूर्तीचाच समावेश असल्याने त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा सर्वोच्च न्यायालयाला उपयोग झाला याचा मला आनंद वाटतो, अशी विनयशील प्रतिक्रिया या निर्णयानंतर शरद पवार यांनी व्यक्त केली. या प्रतिक्रियेत कुणाला एखादी कोपरखळी दिसलीच, तर तो केवळ पवार यांच्याविषयीच्या प्रवादांचा प्रभाव म्हणावा लागेल. शरद पवार यांची कोणतीच खेळी थेट असत नाही, प्रत्येक चाल तिरकीच असते, किंवा त्यांच्या प्रत्येक चालीमागे अनाकलनीय असे एक कोडे असते, असे असंख्य प्रवाद पवार यांच्याभोवती सतत पिंगा घालत असतात. पण न्यायालयाच्या समितीने सांगताच पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर करून आणि न्यायालयाच्या शिफारशी नम्रपणे स्वीकारून शरद पवार यांनी आपल्या या जुन्या प्रवादांनाच पूर्णविराम दिल्याचे येथे अत्यंत पारदर्शकपणे दिसते. शरद पवार यांनी लोकसभेच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हाही तो कात्रजचा घाट असावा असे अनेकांना वाटले होते. पण तेव्हाही पवार यांनी आपला शब्द पाळला. लोकसभेच्या निवडणुकीत ते उतरले नाहीतच, उलट आपला हक्काचा मतदारसंघ त्यांनी कन्येसाठी बहाल करून तरुण व उमद्या उमेदवारासाठी राजकारणातील संधींचे दार खुले केले. पवार यांनी राजकारणात अनेकदा पडद्यामागे राहणेच पसंत केले. पडद्यामागे राहून किंवा अदृश्य असूनही राजकारणातील अस्तित्व दाखवता येते, हे पवार यांनी वेळोवेळी दाखवून दिले, असे त्यांना जवळून ओळखणारे सांगतात. न्यायपालिकेचा सन्मान म्हणून पदावरून पायउतार होण्याच्या निर्णयामुळे कदाचित पवार यांना थेट पदाचे अधिकार वापरता येणार नसले, तरी या क्षेत्रातील त्यांचा अधिकार कुणीच हिरावून घेऊ  शकणार नाही. न्यायपालिकेने नेमलेल्या या समितीतील ७० वर्षांवरील न्यायमूर्तीच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा जसा सर्वोच्च न्यायालयाला झाला, तसाच शरद पवार पदावर नसले तरीही त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा मुंबई क्रिकेट असोसिएशनला मिळत राहील, यात शंका नाही. हातातली काही कामे पूर्ण करून मगच पदावरून पायउतार होण्याचे पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे, परहस्ते तरी पवार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचा मुंबई क्रिकेट असोसिएशनसारख्या संघटनेचा हक्कदेखील कुणी हिरावून घेऊ  शकणार नाही. ज्येष्ठांनी आता मार्गदर्शन करू नये, तर आशीर्वादापुरते मागे उभे राहावे, असे मागे एकदा अजितदादा पवार म्हणाले होते. पण मार्गदर्शनाची योग्य वेळ कोणती आणि आशीर्वादाची योग्य वेळ कोणती ते ओळखण्याएवढे जाणतेपण ज्यांच्याकडे असते, ती माणसे अशा सल्ले-शिफारशींचा योग्य त्या पद्धतीनेच आदर करीत असतात, हे काळाने सिद्धच केले आहे.