मराठी अस्मितेवर स्वार होण्यासाठी शिवरायांच्या आशीर्वादाचा आटापिटा करणाऱ्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये सध्या सुरू असलेली चढाओढ पाहिली, की या दोन्ही पक्षांचा खरा चेहरा कोणता असा प्रश्न मतदाराला पडू शकतो. राजकारणात युती, आघाडय़ा अपरिहार्य असल्या तरी स्वपक्षाचे बळ वाढविण्यासाठी एकमेकांसोबत फरफट होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाला घ्यावीच लागते. काँग्रेस-राष्ट्रवादी या परस्परांना पाण्यात पाहणाऱ्या पक्षांनीही एकमेकांवर यथेच्छ लाथाळ्या झाडत तब्बल १५ वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. सत्तेत असूनही परस्परांना वैऱ्याची वागणूक देण्याच्या त्यांच्या नीतीला एक शिस्त तरी होती. सारे काही स्थिरस्थावर असताना बदनामीची कोणतीही संधी कोणत्याही पक्षाने सोडली नव्हती. पण निवडणुकीचा हंगाम सुरू होताच, वैराची हत्यारे म्यान करून खांद्याला खांदा लावत जिवाभावाचे सहकारी असल्याचा बेमालूम अभिनय दोन्ही पक्ष नेहमीच करत असत. ते बेरजेचे राजकारण केले नाही, तर ज्या सत्तेसाठी सतत एकमेकांवर टीका करतो, ती सत्ताच दूर जाईल एवढे समजण्याचा राजकीय शहाणपणा व संयमदेखील या दोन्ही पक्षांकडे होता. शिवसेना आणि भाजपमध्येही कुरघोडीच्या आणि बदनामीच्या खेळाने टोक गाठले आहे. पण ही रीत उलटी आहे. सत्तेत असतानाही भाजपवर टोकाची टीका करण्याची कोणतीच संधी शिवसेनेने सोडली नव्हती. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून एकमेकांना अफझलखान, निजाम आणि रझाकारांची विशेषणे देत कागाळ्या काढतच दोन्ही पक्ष वावरत आहेत. सत्तेसाठी नाइलाजाने त्यांचे हात बांधले गेले नसते, तर एव्हाना ते परस्परांवर उगारले गेले असते, एवढा या दोन पक्षांतील कडवटपणा शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकी संसदेत भाषण करत होते, तेव्हा इकडे शिवसेनेचे प्रवक्ते केंद्र सरकारला ‘निजामाचा बाप’ म्हणून हिणवत होते. मोदी जेव्हा महासत्तांना दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत होते, तेव्हा शिवसेनेचे प्रवक्ते राज्याच्या एका कोपऱ्यात मोदींना राजनीतीचे धडे देत होते. अखेर त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिलीच, पण मुखपत्राच्या माध्यमातून सरकारविरुद्ध पुकारलेला सामना परतवून लावण्यासाठी आता भाजपचे सहानुभूतीदार आणि रा. स्व. संघाचे मुखपत्र असलेल्या दैनिकानेही बाह्या सरसावल्या आहेत. आता सेना-भाजपमधील ‘सामना’ एकतर्फी होणार नाही. सेनेने ‘निजामाचे बाप’ म्हटले, तर भाजपच्या सरकारात असलेल्या शिवसेनेच्या शिलेदारांना सालारजंग आणि कासीम काझीच्या उपमा देत हल्ला परतवण्याची तयारी भाजपने सुरू केलीच आहे. ही लुटुपुटूची लढाई मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत चालेल असे म्हणतात. नंतर जेव्हा सत्तेसाठी एकत्र यावे लागेल, तेव्हा हेच ‘निजामाचे बाप’ आणि ‘रझाकार’ हातात हात घालून ‘शिवरायांचाच जयजयकार’ करतील, आणि मतदारांना हे उमगेल, तोवर निवडणुका पार पडून गेलेल्या असतील.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
raigad lok sabha seat marathi news, bjp ncp raigad lok sabha seat marathi news, raigad lok sabha marathi news, ncp ajit pawar sunil tatkare raigad lok sabha seat marathi news,
रायगडवरून अजित पवार – तटकरे आक्रमक, भाजपला सुनावले
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
bjp lok sabha candidate akola marathi news, akola lok sabha bjp marathi news, akola lok sabha candidate bjp marathi news
अकोल्यात भाजपची उमेदवारी कोणाला ?