ज्या राष्ट्राचे प्रमुख राष्ट्रऋषी आहेत त्या राष्ट्रात हे असे होणारच. ज्या राज्याचे (पक्षी – मध्य प्रदेश) मुख्यमंत्री (पक्षी – शिवराजसिंह चौहान) या राष्ट्रऋषींचे भक्त आहेत त्या राज्यात हे असे होणारच. आपल्या राष्ट्रऋषींना एक बलदंड, सशक्त, स्वच्छ, काळ्या पैशांविरहित, रोकडरहित, काँग्रेसमुक्त नवभारत समोर दिसत असतो. त्यांच्या दिव्य दृष्टीस दिसणारा भारत हा निर्गुण नसतो सगुण, सावयव असतो. आता त्यांच्या संगतीत राहिल्याने, त्यांचे मार्गदर्शन घेतल्याने त्यांच्याइतकी नाही तरी थोडीबहुत दिव्यदृष्टी शिवराजसिंह यांनाही प्राप्त होणे ओघाने आलेच. त्यांना त्यांच्या राज्यातील नर्मदा नदी अशीच सावयव दिसली असावी. त्यामुळेच मग त्यांनी राज्य विधानसभेचे एक दिवसाचे खास अधिवेशन बोलावले आणि नर्मदा नदीला मनुष्याचा दर्जा मोठय़ा आदराने दिला. धन्य ते राष्ट्रऋषी.. धन्य ते शिवराजसिंह. याच धन्यघोषात आणखीही एक नाव घ्यायला हवे ते उत्तराखंड उच्च न्यायालयाचे. सुमारे महिनाभरापूर्वी या न्यायालयाने गंगा, यमुना व तिच्या उपनद्यांना असाच मनुष्याचा दर्जा दिला. नद्यांना हा असा दर्जा देणे अर्थहीन आहे, असे वितंडवादी पुरोगाम्यांना वाटेल कदाचित, पण आपल्या संस्कृतीचे भान व अभिमान नसल्याचा तो परिणाम. शिवाय, त्यामुळे जो व्यावहारिक फायदा व्हायचा आहे तो त्यांना उमजलेलाच नाही. गंगा, यमुना, नर्मदा काय किंवा आपल्या महाराष्ट्रातील गोदावरी, चंद्रभागा, कोयना, जगबुडी, पूर्णा, मिठी काय.. त्यांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी किती तरी कायदे केले गेले आजवर. त्यात उद्योगांचे पाणी सोडू नये, वाळूचा उपसा होऊ नये, त्यांच्या किनाऱ्यांवर बांधकामे होऊ नयेत, त्यांचे प्रवाह वळवू नयेत यासाठी काय काय केले गेले आजवर सरकारी पातळीवर. पण सारेच फोल गेले ते. आणि ते तसे जाणारच होते. कारण या नद्यांविषयी लोकांना काही म्हणजे काहीच भावनिक ओलावा नव्हता. म्हणून मग ते नद्यांशी कसेही वागायचे. नद्यांचा छळ व्हायचा. पण आता तमाम देशवासीयांना या नद्या म्हणजे केवळ पाणी आणि त्यातील गोटे आहेत असे वाटणार नाही. नदी ही मनुष्यसमान आहे.. आणि नदी ‘ती’ असल्याने मातेसमान. आपल्या मातेला का कुणी असे छळते? छे छे. असला प्रमाद देशवासीयांच्या हातून घडणे निव्वळ अशक्य आहे. मातेला.. मग ती गोमाता असो वा नर्मदामाता.. तिची योग्य काळजी तिचे सुपुत्र घेणारच. आणि जर कुणी तिच्याकडे वाकडय़ा नजरेने पाहिले तर मग त्याची खैर नाही. हे सगळे पाहता नद्यांना मनुष्याचा दर्जा देण्याचा निर्णय किती योग्य आहे ते समस्तांना नक्कीच पटेल. आपला देशात पुन्हा एकदा नद्या निर्धोकपणे खळाळून वाहू लागतील.. तसलाच खळाळता आनंद देशाच्या नसानसांतून वाहू लागेल आणि समस्त देशवासी एका सुरात जयजयकार करतील.. नर्मदे हर हर.. गंगे हर हर.. यमुने हर हर..