ही माहिती तशी सर्वत्र प्रसारित झालेलीच असेल, परंतु तरीही ती पुढे पाठविल्यापासून आम्हांस राहवत नाही. कां की हल्ली कोणताही संदेश ‘फॉरवर्ड’ केल्याशिवाय आत्म्यास चैनच पडत नाही आमच्या. तर ही माहितीवजा बातमी – जी तुम्हांस कोणताही मीडिया दाखविणार नाही असे नाही – ती आहे आमच्या लाडक्या अभि-नेत्या सुश्री स्मृतीबाई इराणी यांच्याविषयीची. नुकताच त्यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालयाचा रिक्त कारभार अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आला. आनंदवार्ताच ही. ती ऐकून संपूर्ण माहिती व प्रसारण क्षेत्रास हास्यवायूच होणे तेवढे बाकी आहे. स्वाभाविकच आहे ना ते. आज पहिल्यांदाच या क्षेत्रास ‘आपला माणूस’ मिळाला, की ज्यास माहितीची समज आहे आणि प्रसारणाची जाण आहे. यावर काही नतद्रष्ट असे म्हणतील की, मग त्याकरिता इराणीबाईच कशास हव्यात? हे काम तर भाजपच्या आयटी सेलमधील कोणीही केले असते. तर ते तसे नाही. इराणीबाईंना या क्षेत्राची अंतर्बाह्य़ माहिती आहे. तशी ती त्यांना मानव संसाधन मंत्रालयाचीही होती. एकदा कॉलेजात गेल्या होत्या त्या. शिवाय त्यांच्याकडे पदवीसुद्धा होती इम्पोर्टेड. आता अशी माहीतगार व्यक्ती एखाद्या मंत्रालयास लाभणे हा म्हणजे दुग्धशर्करा योगच. तोही क्वचितच येणारा. परंतु आपल्या ‘दैवी देणगी’ने हा योग आपल्यास सहजच भेट म्हणून दिला आहे. चांगले दिन म्हणतात ते याहून वेगळे कोणते असतात? आता खरे या क्षेत्रास चांगले दिन येणार याबाबत आम्हांस तर शंकाच नाही. किंबहुना आमची तर खात्रीच आहे, की सन २०२० पर्यंत या देशातील तमाम खासगी वाहिन्यांहून दूरदर्शनची लोकप्रियता वाढणार. दूरदर्शनवर इराणीबाई सातत्याने दिसू लागल्या की काय बिशाद आहे त्याची लोकप्रियता न वाढण्याची? तसेही हल्ली राजकारण आणि अभिनय यांतील अंतर दिवसेंदिवस कमी होतच चालले आहे. राजकारणातही ‘डायलॉगबाजी’ला महत्त्व आलेले आहे. आणि तेथे इराणीबाईंचा क्रमांक नेहमीच दुसरा राहिलेला आहे. इराणीबाईंच्या आगमनाने आमच्या काही च्यानेली पत्रबंधूंचे चेहरे एरंडेल प्याल्यासारखे कडवट झाले आहेत हे खरे. कोणास वाटते की, इराणीबाई त्यांच्याकडे आता चांगलेच पाहून घेतील, म्हणून ते भयग्रस्त झाले आहेत. परंतु आमच्या माहितीनुसार, त्याचे खरे कारण वेगळेच आहे. माहिती-प्रसारण मंत्रालयाचा इतिहास सांगतो, की त्या खात्याच्या मंत्र्यांचे भाग्यच एकदम उजळते. पाहा ना, इंदिरा गांधी, वेंकय्याजी नायडू. आणि आता तेथे आता इराणीबाईंची वर्णी लागलेली आहे. काय सांगावे, उद्याच्या पंतप्रधानही त्या असू शकतील!