पश्चिम घाटात सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला ही फेक न्यूज आहे, अशी सणसणीत प्रतिक्रिया आमच्या एका सुहृदाने संतापून दिली. या प्रतिक्रियेच्या पुढे त्याने लालेलाल संतप्त इमोजी टाकलेली असल्याने आम्हास त्याचा सात्त्विक संताप किती तीव्र आहे हेही धगधगीतपणे जाणवले. परंतु तरीही आम्हास हे कळेना की त्या बातमीत काय बनावटगिरी आहे. ती तर तथ्यांवर आधारित होती. पण त्यास ते सुतराम पटेना. ती फेक न्यूजच आहे असेच तो ठामपणे म्हणत राहिला. अलीकडे त्याने व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठात प्रवेश घेतला असल्याने सर्वच विषयांवर ठामपणे बोलण्याचा आत्मविश्वास त्याच्यात आलेला आहे, हे खरे. परंतु तरीही सापाची नवी प्रजाती सापडणे या बातमीला फेक न्यूजच्या रकान्यात बसविणे म्हणजे फारच झाले. फेक न्यूज म्हणजे अखेर असते तरी काय? तर जे वृत्त वा वृत्तान्त वा माहिती वा मत आपल्या मतांच्या विरोधी असते, ते कितीही खरे असले, तथ्याधारित असले, तरी त्यास रेटून फेक न्यूज असेच म्हणतात आणि खोटय़ा बातम्यांना ‘मीडिया आपको ये नही दिखाएगा’ असे म्हणून पवित्र सत्य म्हणून पेश करतात. पण सापाची नवी प्रजाती सापडली हे तर धादांत खरेच आहे. तेव्हा त्यास खोदून विचारले की हे बृहस्पतीपुत्रा, तुझा आक्षेप नेमक्या कोणत्या गोष्टीला आहे? तेव्हा तो उत्तरला : बातमी खरी असो वा खोटी, पण नवी प्रजाती सापडली असा डांगोरा तुम्ही जो पिटता आहात, त्यात काही अर्थ नाही. अशा नवनव्या प्रजाती तर दिवसाला एक सापडत आहेत. म्हणजे हेच पाहा, काही साप पक्ष्यांची अंडी खातात, हे सर्वाना माहीत आहे. पण कधी या पक्षाबरोबर, तर कधी त्या पक्षाबरोबर फिरणारी सापाची एक नवी प्रजात अलीकडे सापडली आहे हे आहे तुमच्या गावी? सरडे रंग बदलतात हे तुम्हाला माहीत आहे. पण अलीकडे रंग बदलणारे नव्याच प्रकारचे साप दिसले आहेत. विशेष म्हणजे ते दुतोंडी आहेत, याचा आहे तुम्हाला पत्ता? फार काय नुकताच आमच्या पाहण्यात एक साप असा आला, की त्याची जीभच विषारी होती. पण तुम्ही त्याच्या बातम्या काही दाखविणार नाही. मागे एकदा असाच एक साप पाहिला होता आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर. तो फक्त फुत्काराने वारुळे विषयुक्त करून टाकत असे. वारूळभक्त साप म्हणतात त्याला. पण त्याबद्दल तुम्ही बोलणारच नाही. खरेच होते की त्याचे म्हणणे. सापनाथ जाऊन नागनाथ आले, तरी सापांच्या या प्रजाती नित्यनूतन आहेत, हे कुणी ध्यानी घेतलेच नाही..