खरे म्हणजे, शिवसेना हा ‘बोलणाऱ्यांचा’ नव्हे, तर ‘करून दाखविणाऱ्यांचा’ पक्ष.. बोलणारे नेते या पक्षात मोजकेच. जे राव-पंत, कधी काळी बोलत असत, त्यांची बोलतीही बंद झाली आहे. आता केवळ ‘करून दाखविण्या’चीच सद्दी सुरू असताना, कुणी तरी काही ‘ठामपणे’ बोलावे, त्यातही, सुभाष देसाईंसारख्या नेत्याने काही बोलावे हे पक्षांतर्गत आश्चर्य!.. म्हणूनच, ‘करून दाखविणाऱ्यां’च्या सद्दीत या सुभाष यांची भाषिते पक्षाला ‘सुभाषिता’सारखी भासत असावीत. वरवर पाहता, सेनेच्या साच्यात मावणारा त्यांचा स्वभाव नाही. ‘करून दाखविणे’ किंवा ‘बोलून दाखविणे’ अशा कोणत्याच फंदात ते कधी पडल्याचे क्वचितच कुणाला आठवत असेल. त्यामुळेच, देसाईंचे ‘सुभाषि’त दखलपात्र ठरले. हजार वेळा ‘करून दाखविले’ तरी दिसणार नाही, असे काही तरी देसाईंनी एकदाच ‘बोलून दाखविल्या’ने दिसून आल्याचा अनेकांना भास झाला. महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाल्याने आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे स्वप्न साकारण्यात विलंब लागणार नाही, अशा आशेने सैनिकांच्या नजरा सरकारकडे लागल्या असताना, आसपास अनेक माश्या शिंकताहेत हे कधी फारसे कुणाच्या लक्षातच आले नव्हते. काल-परवा एक माशी शिंकली, आणि ती उंटाच्या पाठीवरची अखेरची काडी ठरली. पण उंटाने कसेही करून, ‘उठा’यलाच हवे, हे देसाई नावाच्या या निष्ठावान सैनिकाने जाणले, आणि उंटावरच कुरघोडी केली. शिवाजी पार्कवरील महापौर निवासात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या निर्णयास कुणी तरी न्यायालयात गेले. बाळासाहेब हे ‘असंवैधानिक’ नेते असल्याने सरकारी जागेवर त्यांचे स्मारक उभारू नये, अशी मागणी केली. आता सेनेची पंचाईत होणार असे दिसत असतानाच, क्वचितच बोलणारे देसाई या आव्हानाची हवा काढण्यास सरसावले. महात्मा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांची सर्वागीण तुलना होऊ शकत नाही, हे कोण अमान्य करेल? ..राष्ट्रपिता असलेल्या महात्मा गांधींकडे तरी कोणते संवैधानिक पद होते?.. तरीही सरकारी जमिनींवर जागोजागी त्यांची स्मारके उभी राहिलीच, आणि सरकारी योजनांनाही त्यांची नावे दिली गेलीच ना?.. बाळासाहेबांकडेही संवैधानिकपद भलेही नसेल, पण तेही हिंदुहृदयसम्राट होतेच. मग त्यांच्यासाठी सरकारी जमिनीवर स्मारक उभारले जावे ही तर जनतेची इच्छा आहे.. हा देसाईंनी बोलून दाखविलेला युक्तिवाद भले कुणाला राष्ट्रपित्याचा अपमान वाटेल.. पण स्मारकाची बाजू भक्कम करण्यासाठी सेनेच्या बाजूने फारच कामाचा आहे. सेनेतील बाकीच्या बोलक्या पोपटांनी पुढे कितीही ‘पंची’ केली, तरी त्यांचा सूर देसाईंच्या सुराच्या अवतीभवतीचाच ठेवावा लागणार. कारण स्मारकाच्या बाजूने करावयाच्या युक्तिवादाचे सारे पक्षांतर्गत श्रेय देसाईंनी कधीच हिरावून घेतले आहे!