समोर ठेवलेला हातोडा मेजावर जोरजोरात आपटत उच्चस्थानावरील विद्वान गृहस्थांनी पुकारा केला.. ‘शांतता शांतता शांतता.’ अर्जदाराने आपले म्हणणे येथे मुद्दय़ास धरून ऐसे मांडावे. मग अर्जदार बोलता झाला. ‘महोदय, तर हे सारे प्रकरण या गीताविषयी आहे. हे गीत म्हणजे आपुल्या भुईचा अभिमानबिंदू. आपुले अस्तित्व म्हणजे हे गीत आणि त्या अस्तित्वाचा जयजयकार म्हणजे हे गीत. हे गीत सकलांसाठी हवे, सर्वत्रच हवे. ते हवे घरात, दारात. ते हवे रस्त्यावर. ते हवे पोटभरल्या सुस्त महालात, पाय मुडपलेल्या वन बीएचकेमध्ये, पोपडे उडालेल्या चाळीत, उपाशीपोटी झोपडीत. आणि ते हवे रंजनाच्या पडद्यावरही. हा पडदा म्हणजे आयुष्याचा आरसाच दुसरा. तो निरखण्याआधी ऐकायलाच हवे, बघायलाच हवे हे गीत समस्तांनी..’ हे म्हणणे ऐकल्यावर उच्चस्थानस्थ विद्वान गृहस्थाच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. डोईवरील जामानिमा ठीकसा करत ते बोलते झाले. ‘अतियोग्य आहे हे म्हणणे. पडद्यावरील खेळात कोण वीरवृत्तीचा शूरवीर करणार निर्दालन शत्रूचे, कोण करणार प्रेमालाप घालीत वेटोळे झाडांभवती, कोण ढाळणार आसवे ही बाब अलहिदा. कोण गौरांगी, अल्पवस्त्रांकिता दर्शविणार नृत्यचापल्य ही बाब अलाहिदा. हे खेळ पाहता पाहता कोण खाणार काय.. लाह्य़ादी, शीतदुग्ध पदार्थ, वा उष्ण ऐशी पेये हेही अलाहिदा. खेळाआधी दाखवायलाच हवे ते गीत पडद्यावर. तुमचे तुमच्या भुईवर आहे की नाही प्रेम? बाळगता की नाही तुम्ही तिचा अभिमान? मग एवढे तर करायलाच हवे त्यासाठी. उद्या आलीच वेळ तर हाती खड्ग घेऊन उभे राहाल की नाही तिच्या हितार्थ? तर मग हे गीत पाहताना काही क्षण उभे राहण्यात काय इतका अडसर? एरवी दांडगा आहेच तुमचा अनुभव रांगेत उभे राहण्याचा घटिकापळांसाठी. खेरीज, पडद्यावरील रंजनासाठी समूह होणार गोळा. हे गीत पाहुनी, ऐकुनी त्यांच्यात चेतणारच स्फुल्लिंग गारेगार वातानुकूलित वातावरणात. त्यांच्याही धमन्यांतून वाहू लागणार भुईप्रेमाचे रक्त. इतुके की समस्तांचा रक्तगट एक व्हावा. परस्परांप्रती बंधुभाव निर्माण व्हावा. ऐशा भारलेल्या वातावरणी नाहीच येणार कुणाच्या मनी काही कुविचार, तरीही उद्भवलेच एखाद्याच्या मनी तेथून परागंदा व्हावयाचे, तर तैसे होणे नको. याचसाठी या गीतास प्रारंभ होण्याआधी दडपून बंद करावीत समस्त द्वारे. पडद्यावरील या गीतासाठी हे ऐसे उभे राहणे, त्यापुढे नतमस्तक होणे म्हणजे तर आपल्या भुईप्रतीचे पुण्यकर्म आणि कर्तव्यच थोरले. त्यात कुचराई नाही घेतली जाणार खपवून. जे करतील कुचराई ते तर भुईविरोधी.. भुईद्रोही. ऐसा शिक्का हवा असेल कपाळाशी तर खुशाल करा कुचराई, आणि मग भोगा जे होईल काही, असे म्हणत उच्चस्थानस्थ विद्वान गृहस्थांनी समोरच्या कागदार काही खरडले आणि उठून ते त्यांच्या दालनात नाहीसे झाले..