अस्मितेचे प्रयोग करण्यात आपले राजकारणी आता तरबेज झाले आहेत. त्यातून, एखाद्याला नावलौकिक मिळाला की तो आपलाच कसा, हे सांगण्याची स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये असती तर भारतीय राजकारण्यांना नक्कीच पदके मिळाली असती. तशी स्पर्धा येत्या- २०२० च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये होण्याचीही शक्यता नसली, तरी ऑलिम्पिक पदकविजेत्या पी.व्ही. सिंधूच्या बाबतीत सध्या तेलंगण व आंध्रचे राजकारणी याच स्पर्धेत तुल्यबळ ठरले आहेत! कायम अस्मितेचे राजकारण हा या दोन्ही राज्यांचा स्थायिभाव. विभाजनानंतर त्याला प्रादेशिकतेची जोड मिळाली आहे, त्यामुळे सिंधू नेमकी कोणत्या राज्याची, यावरून या दोन्ही राज्यांनी आता बाह्या सरसावल्या आहेत. खेळाडूला कुठल्या जाती, धर्मात आणि प्रादेशिक वादात गुंतवणे गैरच. क्रीडासंस्कृतीसुद्धा तेच सांगते. परंतु अस्मितेच्या आणि प्रादेशिकतेच्या खेळापुढे ऑलिम्पिकचे काय? पदक जिंकून भारतात आल्यानंतर तेलंगण सरकारने आयोजित केलेल्या सिंधूच्या सत्कारात आंध्रचे मंत्री सामील झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी सिंधूला आंध्रने विशेष विमानाने विजयवाडय़ाला नेले, तेथे तिचा सत्कार घडवून आणला. सिंधूची आई विजयवाडय़ाची म्हणून तिच्यावर आंध्रचा हक्क, तर तिचे वडील आदिलाबादचे म्हणून तिच्यावर तेलंगणाचा हक्क. तेलंगण राज्याने सिंधूचा गौरव करताना तिला भूमिकन्या म्हणून गौरवले. हे बघून आंध्रने तिला तेलुगू कन्या, असा किताबच बहाल केला. अवघ्या देशातून सिंधूवर कौतुकाचा वर्षांव होत आहे. खेळाच्या विकासासाठी हे चांगलेच लक्षण आहे. पण या दोन्ही तेलगू राज्यांत यावरूनही स्पर्धाच. तेलंगणाने सिंधूला पारितोषिक म्हणून पाच कोटी रु. जाहीर करताच आंध्रने ३ कोटी व नव्याने होत असलेल्या अमरावती या राजधानीत मोठा भूखंड देण्याचे जाहीर केले. उद्देश काय, तर तिने हैदराबादला सोडचिठ्ठी देऊन अमरावतीत यावे. सिंधूच्या यशात तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांचा मोठा वाटा आहे. तरीही तेलंगणच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेथील सत्कार कार्यक्रमात तिला आणखी एक ‘चांगला’ प्रशिक्षक देण्याची भाषा करून अस्मितेचे प्रदर्शन घडवले. देशाचे नाव उंचावणाऱ्या या महान खेळाडूला आपल्याकडे खेचण्याच्या नादात ‘सिंधू देशाची कन्या आहे’, या तिच्या आईच्या म्हणण्याचा विसर या दोन्ही राज्यांना पडलेला दिसला. हे केवळ सिंधूच्याच बाबतीत घडते असे नाही. सचिन तेंडुलकरने तेलंगणमधील गाव विकासासाठी दत्तक घेतले म्हणून त्याच्या मराठी असण्याची आठवण करून देणारे राजकीय महाभाग आपल्याकडे आहेतच!