उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद स्वीकारून योगी आदित्यनाथ यांना जेमतेम दोन महिने झाले आहेत. खूप काम करायचे आहे त्यांना भविष्यात. वाटते तेवढे सोपे नाही ते. भारतीय जनता पक्षाची स्वच्छ, पवित्र सत्ता येण्याआधी कित्येक वर्षे तेथे समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांची सत्ता होती. राज्याचा पार बट्टय़ाबोळ करून टाकला या पक्षांनी. कसला तो बहुजन समाज पक्ष.. नुसते पुतळे उभारणारा, आणि कसला तो समाजवादी पक्ष.. सरंजामशाही नुस्ती. असल्या सरंजामशाहीत नोकरशाहीच्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणजे राजाच जणू. वास्तविक योगी आदित्यनाथ हे अख्खे आयुष्य जनसेवेसाठी वाहून घेणारे बैरागी गृहस्थ. मात्र नोकरशाहीला त्यांचा साधेपणा कळलेला नाही. परवाचे उदाहरण. उत्तर प्रदेशातील शहीद जवान प्रेम सागर यांच्या घरी मुख्यमंत्र्यांना जायचे होते. सागर यांच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेश देणे हा त्यांचा हेतू. मुख्यमंत्री तेथे दाखल होण्याआधी नोकरशाहीने काय करावे? सागर यांच्या घरात तातडीने वातानुकूलित यंत्र, सोफा, कार्पेट अशी बडदास्त केली, आणि अध्र्या तासात मुख्यमंत्री तेथून निघताच ही बडदास्त काढून घेतली. ज्या माणसाचे विचार अग्नीसारखे धगधगते आहेत, जो माणूस सदैव काटय़ाकुटय़ांतून मार्गक्रमणा करीत आहे त्याला कसली आली आहे वातानुकूलित यंत्राची आणि कार्पेटची पत्रास? तरीही नोकरशाहीने ही बडदास्त केली कारण आधीच्या सरकारांच्या काळात जडलेली सवय, दुसरे काय. स्वत: मुख्यमंत्र्यांना याची काहीच कल्पना नव्हती म्हणे. अशा अनेक गोष्टी त्यांना माहिती नसतात. त्यांच्या कानापर्यंत जाऊच देत नाहीत अनेक गोष्टी. ‘सन २००७ मधील गोरखपूर दंगलीबाबत योगींवर खटला चालवायचा नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे,’ असे उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयास नुकतेच सांगितले. ‘खटला चालवायचा नाही, असे प्रधान सचिव म्हणतायत,’ असे मुख्य सचिवांनी न्यायालयास सांगितले. ही बाबही आदित्यनाथ यांच्यापासून लपवून ठेवली असावी. अन्यथा ते बाणेदारपणे खटल्यास सामोरे गेले असते. सहारणपूरमध्ये मोठी दंगल झाली. ही दंगल घडविण्यामागे भाजपचे स्थानिक नेते होते, अशी चर्चा होती. पण ही चर्चाही योगींच्या कानांपर्यंत जाणार नाही, अशी तजवीज पोलिसांनी केली असावी. अन्यथा अशी दंगल घडविणाऱ्यांची योगी यांनी खैर केली नसती. गोरक्षणाच्या नावाखाली काही जण उत्तर प्रदेशात गुंडगिरी करीत आहेत, हे ठाऊक असूनही आदित्यनाथांना याची कल्पना दिली तर गायगुंडांची गय नाही म्हणून पोलीसच भ्याले बहुधा. पण, एका रीतीने नोकरशाहीची ही रीत सुज्ञच म्हणायची. इतक्या छोटय़ा गोष्टी मुख्यमंत्र्यांना सांगण्यापेक्षा आपल्या पातळीवरच सोडवण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. योगी हे सोफा, एसी असल्या छोटय़ा गोष्टींच्या खूप पल्याडचे आहेत, त्यांना खूप मोठय़ा गोष्टी करायच्या आहेत, याची जाणीव या नोकरशाहीला आहे म्हणायची. धन्य ते योगी.. धन्य ती नोकरशाही.