‘ताजमहाल’च्या संगमरवरी जादूचे सौंदर्य फिके पडावे असे एक आठवे आश्चर्य उत्तर प्रदेशात आकाराला आले, तर जगभरातील तमाम पर्यटनप्रेमींना आश्चर्य वाटावयास नको. उस्ताद अहमद लाहौरी आणि उस्ताद इसा या वास्तुतज्ज्ञांनी सारे कौशल्य पणाला लावून उभारलेले शहाजहाँच्या पत्नीप्रेमाचे हे प्रतीक पाहण्यासाठी जगभरातून वर्षांगणिक भेट देणाऱ्या कोटय़वधी पर्यटकांना उत्तर प्रदेशातच एक नवा पर्यटनयोग संभवतो. उत्तर प्रदेशाचा राजकीय नकाशा ‘भगवा’ झाल्यानंतर राज्यात ‘संस्कारी पर्यटना’ची परंपरा सुरू करण्याचा योगीजींचा सुप्त मनोदय वास्तवात साकारण्यासाठी सरकारची शर्यत सुरू झाली आणि पर्यटनमंत्री रीटा बहुगुणा यांनी त्यात पहिला क्रमांक पटकावला. ताजमहाल आणखी १५ वर्षांनी चारशे वर्षांचा होईल. ही जागतिक वारसावास्तू म्हणजे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना मानणाऱ्या नजरांना ताजमहालाचा विसर पडावा, असा नवा नजराणा गोरखपुरात आकाराला येणार आहे. हे संभाव्य आठवे आश्चर्य गोरखपुरात अस्तित्वात यावे यासाठी योगी सरकार सारे संस्कार पणाला लावणार हे नक्की झाले आहे. ताजमहाल हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक नव्हेच, असा योगींचाच दावा असल्याने आणि त्यावर प्रतिवाद शक्यच नसल्याने, ताजमहालाचे सौंदर्यही झाकोळून टाकेल असे प्रतिपर्यटन क्षेत्र उभे करण्याचे आव्हान रीटा बहुगुणा यांच्या खात्याने स्वीकारले. हे तर एक जागतिक धाडसच आहे. चारशे वर्षांत कुणी धजावले नव्हते, ते धाडस योगी सरकारच्या पर्यटन खात्याने केले आहे. गोरखपुरातील गोरखनाथ मंदिर हे आठवे आश्चर्य म्हणून ताजमहालाच्या सौंदर्याला आव्हान देणारे पर्यायी पर्यटनस्थळ उभे राहील, तेव्हा कदाचित तेथे पर्यटकांना भुलविणारी एक भव्य गोशाळा असेल, गोमय आणि गोमूत्राच्या पवित्र परिमळाने भारलेल्या या गोशाळेतील उत्तमोत्तम जातीच्या देशी गाई आणि अस्सल हिंदू संस्कृतीची ओळख करून देणारे देशी वळू या गोशाळेची शोभा वृद्धिंगत करतील, बाजूच्या दालनात संस्कृतीची सारी प्रतीके मांडलेली असतील आणि वातावरण भारून टाकणारे वेदमंत्रांचे उच्चार चहूबाजूंनी पर्यटकांना नकळत पुरातन संस्कृतिकाळात घेऊन जातील.. एकदा हे असे ‘जिवंत’ वारसा जपणारे पर्यटनस्थळ साकारले, की ताजमहालचे तेज आपोआपच फिके पडेल आणि गोरखनाथ मंदिराचे हे सांस्कृतिक वैभव न्याहाळण्यासाठी साऱ्या दुनियेची रीघ ताजमहालाकडे आपोआपच पाठ फिरवून या मंदिराकडे लागेल. उत्तर प्रदेशाचा खऱ्या अर्थाने आर्थिक विकास होईल. मग गोरखनाथ मंदिर हे केवळ जागतिक दर्जाचे आठवे आश्चर्य असलेले एक सामान्य पर्यटनस्थळ राहणार नाही, तर पर्यटनातून विकास साधण्याच्या मंत्राचे एक आधुनिक ‘मॉडेल’ बनेल. योगीजींचे ते स्वप्न जेव्हा केव्हा साकारेल, तेव्हा शहाजहाँच्या या प्रेमचिन्हाला आपोआपच उतरती कळा लागलेली असेल. पडझड एकदा सुरू झाली की जीर्णोद्धार म्हणून ताजमहालचा ‘तेजोमहालय’ करून टाकणे सोपे होईल. तोवर उत्तर प्रदेश सरकारने ताजमहालास पर्यटनस्थळांच्या यादीत पहिला क्रमांकच काय, साधे स्थानही नाकारलेले आहे. संस्कार, संस्कार म्हणतात ते हेच!